घरमहाराष्ट्रनाशिकगंगाघाटावरील कॅमेर्‍यांचे काम दुर्लक्षितच

गंगाघाटावरील कॅमेर्‍यांचे काम दुर्लक्षितच

Subscribe

दोन वर्षांपूर्वी केली होती पाहणी

दिलीपराज सोनार 

नाशिक :महापालिका हद्दीत ठिकठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत. गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी पंचवटीतील धार्मिक स्थळांवर भाविकांसह यात्रेकरुंची होणारी गर्दी अन् गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता रामकुंडसह परिसरात ५० ते ६० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी महापालिका, स्मार्ट सिटी आणि पंचवटी पोलिसांनी एकत्र येत पाहणी केली. मात्र ‘सरकारी काम अन् कित्येक महिने थांब’ याचीच पुन्हा प्रचिती आली. पाहणीनंतर कित्येक वर्षे उलटून अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नसून कोणतीही हालचाल दिसत नसल्याने नागरिकांकडून नाराजीचा सूर व्यक्त केला जातोय.

- Advertisement -

नाशिकला पौराणिक आणि धार्मिक महत्त्व असल्यामुळे नाशिकला दिवसभरात देशासह विदेशातील हजारो भाविक तसेच यात्रेकरू येत असतात. रामकुंडासह काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, सीतागुंफा, गोरेराम मंदिर याबरेबरच तपोवनातील विविध मंदिरे तसेच विविध आखाड्यांच्या साधू-महंतांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी असते. तसेच नाशिक दर्शन करण्यासाठी पर्यटक येत असतात. या पर्यटकांच्या जीवित आणि वित्तीय हानी रोखण्यासाठी तसेच परिसरातील घातपात, गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत गेल्या दोन वर्षांपूर्वी हालचाली सुरू झाल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्थानिक पोलिसांसोबत चर्चा करत परिसरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच मुख्य चौकासह सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पाहणी करण्यात आली. यावेळी सुमारे पन्नासहून अधिक ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या कामाला मुहुर्तच लागलेला दिसून येत नाही.

शहरातील पावसाळी गटारी तसेच भुयारी गटार योजनांचे काम युद्धपातळीवर सुरू असतांना दुसरीकडे मात्र सीसीटीव्हीकॅमेरे बसविण्याच्या कामाला दिरंगाई होत असल्याचे दिसत आहे. वास्तविक पाहता सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यंत गरजेचे असतांनाही या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्मार्ट सिटी कंपनीने या कामाला प्राधान्य देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

नाशिक शहरात सुमारे आठशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. परंतु, मध्यंतरीच्या काळात पोलीस आयुक्तांकडून स्पॉट निश्चित होत नसल्याने त्या कामाला काहीअंशी ब्रेक लागला होता. आतापर्यंत शहरातील वाहतूक सिग्नलवर ४० ते ५० कॅमेरे बसवले आहेत आणि उर्वरित काम लवकरात लवकर कसे सुरू होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
                                                                                     – सुमंत मोरे, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -