घरमहाराष्ट्रनाशिककेबलचालकांचा अघोषित ब्लॅक आउट

केबलचालकांचा अघोषित ब्लॅक आउट

Subscribe

टेलिकॉम रेग्युलॅरिटी ऑफ इंडिया (ट्राय)ने मुदतवाढ देऊनदेखील नाशिक शहरातील बहुतांश केबल ग्राहकांचे प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे. नियमानुसार ग्राहकांना ६ फेब्रुवारीपर्यंत चॅनल निवडीसाठी मुदत असून, त्यानंतर ज्यांनी निवड केली नसेल त्यांच्याकडील चॅनेल्स बंद होणार आहेत.

टेलिकॉम रेग्युलॅरिटी ऑफ इंडिया (ट्राय)च्या वतीने केबलधारकांसाठी नाशिकसह राज्यात नवीन दरपत्रक जाहीर करण्यात आले असून, येत्या ६ फेब्रुवारीपर्यंत फॉर्म न भरल्यास ग्राहकांना त्यानंतर टीव्ही बघता येणार नाही. मात्र, शहरातील काही भागांत दोन दिवसांपासूनच चॅनेल दिसणे बंद झाल्याने केबलचालकांनी अघोषित ब्लॅक आउट पुकारल्याचे चित्र आहे.

ट्रायने लागू केलेल्या नवीन नियमावलीनुसार ग्राहकांना ३१ जानेवारीपर्यंत आपल्या आवडीनुसार चॅनेल निवडीची मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्यापही या प्रणालीबाबत केबल ग्राहकांमध्ये संभ्रम कायम असल्याने एमएसआेंनी चॅनेल निवडीसाठी ग्राहकांना ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र असे असतानाही शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड, पंचवटीसह उपनगरांतील काही भागांमध्ये अनेकांचे टी.व्ही. चॅनेल बंद झाले आहेत. या टी.व्ही. संचावर केबल ऑपरेटर्सशी सपंर्क साधण्याचे संदेश येत आहेत. तर अनेक ठिकाणी आता पूर्वीची चॅनेल बंद होऊन ट्रायने निर्देशित केलेली फ्री टू एअर चॅनल्सच दिसत असल्याने ग्राहकांना नापसंतीच्या वाहिन्याही बघाव्या लागत आहे. यावरून ग्राहकांचा टी.व्ही. रिमोट आता एमएसआेंच्या हाती गेला असल्याचे चित्र सध्या नाशिकमध्ये दिसून येेत आहे. ग्राहकांना आपले आवडीचे चॅनेल निवडता यावे याकरीता केबल ऑपरेटर्सकडून ग्राहकांना विहीत नमुन्यातील अर्जांचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, या अर्जात चॅनेलचे पॅकेज तयार करून त्याचे दर देण्यात आल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम कायम आहे.

- Advertisement -

ट्रायच्या नियमावलीनुसार १३० रुपयांत शंभर चॅनल्स असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात १३० रुपये अधिक जीएसटी असल्याने त्याची किंमत १५४ रुपये होते. प्रसारमाध्यमांमध्ये ‘ट्राय’ने केलेल्या जाहिरातीत १३० रुपयांचा उल्लेख आहे; मात्र वरचे २४ रुपये यात न धरल्याने केबल ऑपरेटर व ग्राहक यांच्यात खटके उडत आहेत. या १५४ रुपयांमध्ये १०० चॅनल्स दिसतील असे ‘ट्राय’ने सांगितले आहे. त्यातील २५ चॅनल्स हे दूरदर्शनचे आहेत. ते दाखवणे अनिवार्य आहे. त्यामुळे ७५ चॅनल्सबाबतच ग्राहक निर्णय घेऊ शकणार आहे. या बाबतीत ग्राहकाने सर्वच्या सर्व फ्री टू एअर चॅनल्सची निवड केली तर त्यांना एक रुपयाही लागणार नाही. मात्र, या ७५ मध्ये पे चॅनल्स निवडले तर त्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत.

नियमावली ठरतेय डोकेदुखी

प्रत्येक घरात वयोगटानुसार चॅनल्स आवडतात. फॉर्म भरताना चॅनल निवडीबाबत एकमत होत नसल्याने ग्राहक सातत्याने केबल ऑपरेटरशी संपर्क साधत असल्याने प्रत्येकाची आवड-निवड लिहून घेताना आता याची माहिती ट्रायच्या अ‍ॅपमध्ये भरणे ही केबलचालकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.

- Advertisement -

ब्लॅक आउट नाही

शहरातील केबलचालकांनी अशा कुठल्याही प्रकारचा ब्लॅक आउट घोषित केलेला नाही. या प्रणालीसाठी ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे मुदतीत अर्ज भरून न देणार्‍या ग्राहकांना फ्री टू एअर चॅनेल्स पाहता येतील.
विनय टांकसाळ, सचिव, केबल ऑपरेटर संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -