विधवा महिलेकडून पैसे उकळणारे दोन मंडलाधिकारी, तलाठी निलंबित

विभागीय आयुक्तांच्या आदेशाने जिल्हाधिकार्‍यांनी केली कारवाई

श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथील एका विधवा महिलेस न्यायालयाच्या आदेशाने वारसाची नोंद लावण्यासाठी मंडलाधिकार्‍याने मागितलेली 25 हजार रुपये दागिने मोडून दिले होते. याप्रकरणी दैनिक ‘आपलं महानगर’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या प्रकरणाची नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गंभीर दखल घेतली. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी श्रीगोंदा महसूल विभागातील दोन मंडल अधिकारी आणि महिला कामगार तलाठी यांना निलंबित केले. त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

देऊळगाव गलांडे येथील एका महिलेचा पती निधन झाल्याने आणि न्यायालयाच्या आदेशाने त्यांचे वारस नोंद लावण्याचे आदेश महसूल विभागाला देण्यात आले. त्यानुसार महिला तो आदेश घेऊन गावातील महिला तलाठी यांच्याकडे गेले. महिला तलाठी यांनी तात्काळ नोंद पकडत फेरफार नंबर दिला. त्याकाळात असलेल्या मंडळ अधिकारी सोनवणे यांनी त्यांची नोंद रद्द केली. मात्र, कोरोनाचाचा कालावधी असल्यामुळे नोंद रद्द केलेली कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र, काही दिवसांनी टाळेबंदी होताच संबंधित महिलेच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी पुन्हा महिला तलाठी देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत माहिती घेतली. त्यांना आपण पकडलेली नोंद मंडळाधिकारी सोनवणे यांनी रद्द केली आहे, हे लक्षात आले. त्यांनी संबंबित महिलेने तलाठी यांच्याकडे नोंद धरणे कमी विनंती केली. त्यावरून महिला तलाठी देशमुख यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा नोंद पकडली होती. मात्र, दरम्यानच्या कालावधीत सोनवणे काही कारणास्तव रजेवर असल्यामुळे त्यांचा अतिरिक्त पदभार साबळे मंडळाधिकारी यांना देण्यात आला होता.

मंडलाधिकारी साबळे यांनी मागितले 25 हजार रुपये देण्यासाठी महिलेने आपले दागिने सोनाराला विकले. त्यातून आलेले पैसे महिलेने साबळे यांना दिले. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार ‘नोंद लावण्यासाठी विधवा महिलेने मोडले दागिने’ या मथळ्याखाली दैनिक ‘आपलं महानगर’मध्ये वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर प्रशासनाला खबडून जाग आली. या वृत्ताची नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी तात्काळ या प्रकरणाचा अहवाल मागितला. शिवाय, याप्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले. त्यानंतर त्यांनी तात्काळ श्रीगोंद्याच्या तहसीलदारांना या घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तहसीलदारांनी याघटनेचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला. जिल्हाधिकार्‍यांनी तो अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी मंडळ अधिकारी सोनवणे, साबळे, महिला तलाठी देशमुख यांना अटी व शर्ती टाकून निलंबित केले.

पोटासाठी दररोज रोजंदारीवर कामाला जाते, पैसे कसे देऊ?

बरेच दिवस होऊनही वारसाची नोंद होत नसल्याने संबंधित महिलेने मंडलाधिकारी साबळे यांची भेट घेतली. त्यावेळी साबळे यांनी त्या महिलेकडे 25 हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी त्या विधवा महिलेने त्यांना सांगितले की, मी गरीब आहे, पोटासाठी दररोज रोजंदारीवर काम करते. मी इतके पैसे देऊ शकणार नाही, असे त्या महिलेने सांगितले.