घरमहाराष्ट्रनाशिकप्रभाग ३८ : नवे समीकरण; तळे राखेल तो पाणी चाखेल

प्रभाग ३८ : नवे समीकरण; तळे राखेल तो पाणी चाखेल

Subscribe

नाशिक महानगरपालिका रणधुमाळी

नाशिक : प्रभाग २४ चा १५ टक्के, प्रभाग २९ चा ६० टक्के आणि प्रभाग २७ चा २५ टक्के परिसर एकत्रित होऊन प्रभाग ३८ ची निर्मिती झाली आहे. सर्वसाधारणपणे नवनिर्मित प्रभागावर सेना, भाजप व राष्ट्रवादी पक्षांचे संमिश्र वर्चस्व राहिल्याने आगामी निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रभागात काही प्रमाणात विकासकामे झाली असली तरी नागरिकांना अपेक्षित विकास झाला नसल्याचा आरोप केला जातोय. प्रभागातील स्वामी विवेकानंद नगर, एकता चौक, सिडको एस 1 व एस 2 सेक्टरसह गणेश चौक शाळेमागील परिसरात नगरसेवक फिरकलेच नसल्याची व या भागात विकासकामे झाली नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. ड्रेनेजची समस्या, बंद पडलेल्या समाज मंदिरांची दूरवस्था यांसारख्या समस्या आजही कायम आहेत. याशिवाय मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही, उद्यान नाही. एकमेव विवेकानंद मैदानावर कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत. स्वच्छतागृहांची वाणवा तर मोठा अडचणीचा विषय असल्याचा तक्रारीचा पाढा स्थानिकांकडून वाचला जात असल्याने विद्यमान नगरसेवकांच्या कर्तव्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.

- Advertisement -

प्रभागरचनेतील फेरबदलांनी आजी-माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुकांच्या नगरसेवकपदाच्या स्वप्नांना पुन्हा उजाळा मिळाल्याने प्रभागातील इच्छुकांची संख्या वाढली आहे. यात भाजपकडील इच्छुकांच्या संख्येने (१८) दोन अंकी आकडा गाठला आहे, तर इतर सर्वच पक्षांकडील इच्छुकांची संख्या १० च्या आत राहिली आहे. भाजपकडे इच्छुकांचा कल व प्रबळ दावेदारांची संख्या पाहता प्राधान्यक्रम ठरवताना भाजप पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे. मागील पाच वर्षात विशेषतः कोरोना काळात नागरिकांसाठी लक्षवेधी काम करणारे शिवाजी बरके, हर्षा फिरोदिया, विद्यमान नगरसेविका छाया देवांग यांच्यासह अर्चना दिंडोरकर, उत्तम काळे, संगीता काळे, राजेंद्र जडे, प्रभावती जडे, संगीता बरके, प्रवीण मोरे, प्रकाश भालके, शेखर निकुंभ, दिव्यांग आघाडीकडून बाळासाहेब घुगे इच्छुक आहेत. विद्यमान नगरसेविका देवांग यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर फिरोदिया, शिवाजी बरके यांचा जनसंपर्क, त्यांनी केलेली कामे आणि जनमाणसातील त्यांची प्रतिमा, त्यांच्या उमेदवारीच्या मार्गातील अडसर दूर करणारे ठरू शकते. माजी नगरसेविका सुमन सोनवणे, शेखर निकुंभ, प्रकाश भालके, उत्तम काळे, अर्चना दिंडोरकर हेदेखील प्रबळ दावेदार ठरू शकतात. नवीन नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक राजेंद्र महाले हे दावेदार असले तरी प्रभाग ३८ ऐवजी त्यांच्याकडून प्रभाग ३० ला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून बाळासाहेब गीते, मकरंद सोमवंशी, अजय पाटील यांच्यासह सातत्याने सामाजिक उपक्रमात अग्रेसर तरुण चेहरा म्हणून वैभव देवरे यांना संधी मिळू शकते.

शिवसेनेकडून जेष्ठनेते पुंजराम गामणे पुन्हा एकदा संधीच्या प्रतीक्षेत असुन, रमेश देवांग, अमोल सोनवणे, हर्षदा सोनवणे, सुयश पाटील, बबलू सूर्यवंशी, कुमुदिनी सूर्यवंशी यांच्यासारखे नवे-जुने चेहरे रणधुमाळीत उतरण्याची इच्छा बाळगून आहेत. मनसेच्या गोटातूनही विद्यमान पदाधिकारी अरुण वेताळ, वर्षा वेताळ यांच्यासह संदीप दोंदे, प्रणव मानकर, शंकर कानकुसे हेदेखील इच्छुक आहेत. काँग्रेसकडून माजी नगरसेवक व जेष्ठ नेते लक्ष्मण जायभावे हे पुनःश्च हरिओम म्हणत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासह माणिक जायभावे,संतोष ठाकूर,प्रिया ठाकूर हे देखली इच्छुक आहेत. एकूणच प्रभागाची भौगोलिक रचना, विस्तार,लोकसंख्या आणि राजकीय समिकरणांचे गणित पहाता जो तळे रखील,तोच पाणी चाखील असे चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -