Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE एकाच व्यक्तीच्या दोन चाचण्यांचे रिपोर्ट का येतात वेगवेगळे?

एकाच व्यक्तीच्या दोन चाचण्यांचे रिपोर्ट का येतात वेगवेगळे?

कोरोनाचे अंतरंग अँटीजेन की आरटी-पीसीआर?

Related Story

- Advertisement -

अँटीजेन, आरटीपीसीआर, एचआर-सीटी असे कितीतरी शब्द कोरोनामुळे गेल्या वर्षभरात अनेकांच्या तोंडपाठ झालेत. मात्र तरीही, या चाचण्या नेमक्या कशा करतात, रिपोर्टमधला आकडा नेमका काय दर्शवत असतो, सीटी स्कोअर म्हणजे काय, पल्स ऑक्सिमीटर वापरण्याची शास्त्रशुद्ध पद्धत काय, कोरोना उपचारांची दिशा कशी ठरते, बचावात्मक उपाययोजना काय अशा विविध प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न या मालिकेतून करणार आहोत. आजच्या या भागात कोरोना निदानासाठी जगभरात वापरल्या जात असलेल्या दोन प्रमुख चाचण्यांची माहिती घेणार आहोत.

एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला किंवा नाही याचे निदान करण्यासाठी जगभरात अँटिजेन आणि आरटी-पीसीआर या दोन प्रचलित पद्धतींचा वापर केला जातो. या दोन्हीही पद्धतींमधून संसर्गाचे निदान होत असले तरीही, त्यांची कार्यप्रणाली आणि मापदंड हे वेगवेगळे आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेला रुग्ण आरटी-पीसीआर टेस्टमध्ये हमखास पॉझिटिव्ह येतोच, मात्र अनेकदा अँटिजेनचा रिपोर्ट निगेटिव्ह असताना तोच व्यक्ती आरटी-पीसीआर चाचणीत मात्र पॉझिटिव्ह आढळून येतो. त्याचे कारण म्हणजे आरटी-पीसीआर (रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमिरेस चेन रिअॅक्शन ) चाचणीची अचूकता.

- Advertisement -

कोरोना हा विषाणू आरएनए (रिबोन्युक्लिक अॅसिड) प्रकारातील असल्याने प्रारंभी संशयित व्यक्तीच्या नाकातील व घशातील स्त्रावाचा नमुना घेतला जातो. त्यानंतर त्यात कोविड-१९ आरएनएचे असित्त्व आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी पॉलिमिरेस चेन रिअॅक्शन अर्थात आरटी-पीसीआर पद्धतीचा वापर केला जातो. त्यासाठी प्रयोगशाळेत प्रथम आरएनए विलग केला जातो आणि आणि त्यानंतर तो सी-डीएनए (कॉम्प्लिमेंटरी डीएनए) मध्ये रुपांतरीत केला जातो. रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शनद्वारे (आरटी) ही प्रक्रिया पार पडते. यात डीएनएची प्रतिकृती तयार करून कोविड-१९चा विशिष्ट प्राइमर आणि प्रोबच्या सहाय्याने त्यावर पॉलिमिरेस चेन रिअॅक्शन (थर्मल सायकलिंग) केली जाते. प्रत्येक थर्मल सायकलमध्ये उच्य तापमानाला सी-डीएनएचे विकृतीकरण होऊन  कमी तापमानाच्या टप्प्यात विशिष्ट प्राइमर प्रोब हायब्रिडाईज होऊन डीएनएचे संश्लेषण होते. या प्रक्रियेमध्ये विशिष्ट फ्लुरोसन्स उत्सर्जित केला जातो व या उत्सर्जित केलेल्या फ्लुरोसेन्सची नोंद केली जाते.

विशिष्ट वेगवेगळे कोविड-१९ प्रोब हे वेगळ्या फ्लुरोफोऱने जोडलेले असल्याने, प्रत्येक थर्मल सायकल (१ ते ४०) दरम्यान वेगवेगळ्या फ्लुरोसेन्सची सतत नोंद होत असते. म्हणूनच या उपकरणाला रिअल  टाइम पीसीआर म्हणतात. ज्या थर्मल सायकलमध्ये लक्षणीय प्रतिदीप्तित (फ्लुरोसेन्स) मध्ये  वाढ दिसते आणि त्या सायकल़च्या क्रमांकाला सीटी व्हॅल्यू असे दर्शवले जाते.

- Advertisement -

यात कोरोनाच्या विषाणुंचे अस्तित्व शोधायचे असल्याने त्यासाठी आधीच ठरवून दिलेल्या मापदंडांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या मापदंडांनुसार ४० वेळा पडताळणी (सायकल्स) पूर्ण केल्यानंतर त्याचा निष्कर्ष पुढे येतो. अर्थात रुग्णाच्या नमुन्यांना काही प्रतिक्षिप्त क्रिया दर्शविणाऱ्या वेगवेगळ्या घटकांसोबत पीसीआर मशिनमध्ये ठेवले जाते. मशीन प्रत्येक सायकलनुसार त्यातील फ्लोरोसण्ट ओळखून सर्व सायकल्सच्या शेवटी त्यानुसार रंगसंगती असलेली एक रचना दाखवते. ज्या सायकलला फ्लोरोसण्टची लक्षवेधी वाढ (थ्रेशहोल्ड सायकल अर्थात सीटी व्हॅल्यू) दिसून येते. जेवढी सीटी व्हॅल्यू कमी तेवढा विषाणूंचा संसर्ग अधिक समजला जातो.

अशी होते अँटिजेन

आरटी-पीसीआर ही आरएनएच्या पातळीवर केली जाते आणि अँटिजेन ही स्पाईक प्रोटिनच्या आधारे केली जाते. स्पाईक प्रोटीनमुळे स्वॅबमधील प्रतिरोधक तत्वांमध्ये (अँटिबॉडीज) अचानक बदल होतात. अशा तत्त्वांचा अँटिजेन टेस्टमध्ये वापर केला जातो. परिणामी स्वॅबच्या नमुन्यात विषाणूंचे अस्तित्त्व असल्यास तसा निष्कर्ष पुढे येतो. बाह्य विषाणूंचा संसर्ग झाल्याचे लक्षात येताच शरीर तातडीने त्यांचा नाश करण्यासाठी स्वतःचे सैन्य अर्थात पेशींना तसे आदेश देते. हे करताना शरीरांतर्गत जे रासायनिक बदल होतात, त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला नाक आणि घशातील स्त्रावाच्या चाचणीतून विषाणूंचे अस्तित्व दिसून येते. मात्र, अनेकदा कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतर काही दिवस ते शरीरात सुप्तावस्थेत थांबलेले असतात. अशावेळी अँटिजेनमध्ये मात्र असा व्यक्ती निगेटिव्ह येतो. त्यामुळेच खात्रीशीर निदानासाठी आरटी-पीसीआर चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो.

कोरोना संसर्गात वेळीच निदान आणि उपचार अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असतात. त्यासाठी भारतासह जगभरात खात्रीशिर निदानपद्धती म्हणून आरटी-पीसीआर चाचणीकडे पाहिले जाते. अत्यंत सूक्ष्म पातळीवर रुग्णाच्या नमुन्यांचे परीक्षण यात होते. 
– डॉ. दादासाहेब अकोलकर, संचालक, दातार कॅन्सर जेनेटिक्स लॅब

- Advertisement -