घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजि.प. शिक्षक बदली प्रक्रियेत सुनावणीची फक्त औपचारिकता

जि.प. शिक्षक बदली प्रक्रियेत सुनावणीची फक्त औपचारिकता

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करताना राबवण्यात आलेल्या प्रक्रियेची तपासणी केल्यानंतर आता हरकतींसाठी एक दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडे मुदतीत प्राप्त होणार्‍या हरकतींवर बुधवारी (दि.14) अंतिम निर्णय घेवून शाळांची सुधारित यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेने यापूर्वी जाहीर केलेल्या अवघड क्षेत्रातील शाळांची यादी राज्य शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली असून, त्यानुसारच बदली प्रक्रिया राबवली जाणार आहे. शिक्षक व शिक्षक संघटनांच्या हरकतींवरील सुनावणी ही फक्त औपचारिकता असल्याचा गंभीर आरोप शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.

जिल्हा परिषदेच्या एकूण 3 हजार 262 शाळांपैकी 536 शाळा या अवघड क्षेत्रात निवडण्यात आलेल्या आहेत. या शाळांची निवड करताना शासनाने ठरवून दिलेल्या निकषांचे पालक न केल्याची टिका शिक्षकांनी केली. त्यामुळे दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण या आदिवासी बहुल तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी या प्रक्रियेवरच आक्षेप घेतला आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्तिश: या प्रकरणात लक्ष लाघून शिक्षकांचे म्हणणे विभागीय आयुक्तांपुढे मांडले. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. डी. कनोज यांनाही मंगळवारी कार्यालयात बोलवून घेत याविषयी विचारणा केली. शिक्षणाधिकारी कनोज यांनी मंगळवारी गट शिक्षणाधिकार्‍यांची बैठक घेवून त्यांनाही हरकतींबाबत सूचना केल्या आहेत. शिक्षकांकडून प्राप्त होणार्‍या हरकती पुराव्यासह असतील तर त्यांचा प्राधान्याने विचार होईल. आवश्यकता वाटल्यास या शिक्षकांची सुनावणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड या घेणार आहेत. दरम्यान, शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांना या प्रक्रियेविषयी शंका उपस्थित केली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षक बदलीची माहिती राज्य शासनाने दिलेल्या पोर्टलवर यापूर्वीच अपलोड केली आहे. त्यामुळे या आकडेवारीत आता काहीच बदल होणार नाही. शिक्षकांची सुनावणी ही फक्त औपचारिकता आहे.

- Advertisement -

आंतरजिल्हा बदलीच्या नियुक्त्या रखडल्या

आंतरजिल्हा बदलीने इतर जिल्ह्यांतून नाशिकमध्ये बदली झालेल्या शिक्षकांची नियुक्ती रखडली आहे. रिक्त जागांची सद्यस्थिती बघितल्याशिवाय या शिक्षकांना नियुक्तीपत्र देता येणार नाही. तसेच जिल्हाअंतर्गत बदलीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने आंतरजिल्हा बदलीने नाशिकमध्ये आलेले शिक्षकही नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.

अवघड क्षेत्रातील शाळांविषयी हरकतींची मुदत एक दिवस वाढवल्याने बुधवारी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. शिक्षकांचे समाधान न झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी या स्वत: शिक्षकांची सुनावणी घेणार आहेत. राज्य शासनाकडे आपण अद्याप शिक्षकांची माहिती अपलोड केलेली नाही. : बी. डी. कनोज, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -