घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र‘ऑनलाईन टास्क’च्या नादात नाशिककरांनी ४ कोटी गमावले

‘ऑनलाईन टास्क’च्या नादात नाशिककरांनी ४ कोटी गमावले

Subscribe

घरबसल्या ऑनलाईन टास्कद्वारे लाखो रुपये कमवा, असा मेसेज किंवा कॉल आल्यास नाशिककरांनो सावधान! सोशलमीडियावर जाहिराती किंवा चित्रफितींना लाईक मिळवणे, एअरलाईन्सची तिकिटे बुकींगचे करण्याचे काम इंटरनेट वापरकर्त्यांना महागात पडू शकते. ऑनलाईन टास्क हा सायबर चोरट्यांचा नवीन फंडा आहे. एखादा चोरट्यांच्या जाळ्यात अडकल्यास त्याचे लाखो रुपये बँक खात्यातून गेल्याच्या घटना नाशिक शहरात घडल्या आहेत. वर्षभरात शहरामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक ऑनलाईन ‘टास्क फ्रॉड’चे गुन्हे असल्याचे आकडेवाडीवरून समोर आले आहे.

नाशिक शहरात दिवसेंदिवस सायबर क्राईममध्ये वाढ होत आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी फसवणुकीसाठी नवनवीन फंडे सायबर चोरटे वापरत असल्याचे नाशिक शहर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. गतवर्षी सेक्सटॉर्शनच्या घटना सर्वाधिक घडल्या होत्या. तर यंदा जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ या कालावधी तब्बल २८ ऑनलाईन टास्क फ्रॉडच्या घडना घडल्या आहेत. चोरट्यांनी २८ जणांना ३ कोटी ९४ लाख २८ हजार १५२ रुपयांना गंडा घातला आहे. २०२२ मध्ये ऑनलाईन टास्क फ्रॉडच्या अवघ्या तीन घटना समोर आल्या होत्या.

- Advertisement -

ऑनलाईन टास्कमध्ये व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, सोशलमीडियाद्वारे संदेश पाठवून आर्थिक लाभाचे आमिष दाखवले जाते. जाहिरात किंवा चित्रफितीला लाईक किंवा क्लिक करण्याचे काम देण्यात येते. विश्वास मिळविण्यासाठी सुरुवातीला खात्यात काही पैसे जमा केले जातात. त्यानंतर ‘पेड टास्क’च्या नावाखाली पैसे गुंतवण्यास भाग पाडले जाते. मोठी गुंतवणूक केल्यास मोठी रक्कम मिळेल, असे सांगितले जाते. मात्र, मोठी रक्कम मिळाल्यानंतर संपर्क तोडला जातो. फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो. विशेष म्हणजे, या प्रकारांमध्ये सर्वाधिक उच्चशिक्षित तरुण-तरुणींची प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका, असे आवाहन नाशिक शहर सायबर पोलिसांनी केले आहे.

ऑनलाइन टास्क हा प्रकार याच वर्षांत सुरू झाला आहे. लाइकचे लक्ष देऊन त्याबदल्यात पैसे कमाविण्याचे आमिष दाखविले जाते. यामध्ये जबरदस्ती करणे, भीती दाखविणे, धमकी अथवा बदनामी असा कोणताही प्रकार नाही. इंटरनेट वापरकर्ते केवळ पैशांसाठी भूलथापांना बळी पडत आहेत. प्रत्यक्षात पैसे कमाविण्याचा ऑनलाईन टास्क नाही, हा विचार नागरिकांनी केला पाहिजे.

- Advertisement -

इंटरनेट, सोशल मीडिया, विविध अ‍ॅप्लिकेशन्स आणि अनोळखी लिंक्सच्या वाढत्या वापरामुळे उच्चशिक्षितांच्या फसवणुकीत झपाट्याने वाढ होत आहे. एकीकडे पंतप्रधान डिजिटल इंडियाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे सायबर फसवणुकीच्या प्रकारांमधील होणारी वाढ चिंताजनक आहे. यात विविध आमिषांना बळी पडणार्‍यांचे प्रमाण अधिक आहेच; शिवाय सोशल मीडियावर उत्सुकता वाढेल अशा पोस्ट अपलोड करून इंटरनेट वापरकर्त्यांना जाळ्यात ओढले जात आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारीपासून नाशिककरांना जागरूक करण्यासाठी ‘आपलं महानगर’ ‘सायबर फ्रॉड’ मालिका सुरु करत आहे. या संदर्भात काही माहिती वा सूचना असल्यास ९१५६३७४३७३ या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधावा.

फसवणुकीचे काही गुन्हे

  • लघु उद्योजकाला २३ लाख ७० हजार

  • ६३५ रुपयांचा गंडा

  • स्थापत्य अभियंत्याला ९४ लाख रुपयांचा गंडा

  • आयटी अभियंत्याला १७.४४ लाख रुपयांना गंडा

  • ३१ वर्षीय गृहिणीची ११ लाख २२ हजार ६४५ रुपयांची फसवणूक

ऑनलाईन टास्क फ्रॉड कॉलव्दारे कधीही नोकरी आणि पैसे मिळत नाहीत. हा फसवणुकीचा एक फंडा आहे. टास्क सांगितल्यानंतर कधीही बँक खात्याची माहिती आणि आर्थिक व्यवहार करू नयेत. फसवणूक लक्षात येताच तात्काळ १९३० या क्रमांकावर कॉल करावा.
तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

ऑनलाईन टास्कचे प्रकार परराज्य व परदेशातून होत आहेत. प्रत्येक गुन्ह्यांत वेगवेगळी बँक खाती आढळून आली आहेत. झटपट पैसे कमविण्यासाठी ऑनलाईन टास्कवर रकमेची गुंतवणूक करू नये. मदतीसाठी सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.
रियाज शेख, वरिष्ठ पोलीस
निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -