घरमहाराष्ट्रअनिल देशमुखांच्या अटकेचा एक-एक मिनिट वसूल करू

अनिल देशमुखांच्या अटकेचा एक-एक मिनिट वसूल करू

Subscribe

शरद पवार यांचा भाजपला इशारा

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अटकेचा एक-एक मिनिट वसूल करु. अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकले त्याची किंमत वसूल झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी भाजपला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विदर्भ दौर्‍यावर होते. नागपूरमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यावेळी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुखांच्या अटकेवरून शरद पवारांनी भाजपवर हल्ला आहे.

शरद पवार म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांमध्ये आजचा असा पहिला दिवस आहे की नागपूरमध्ये आलो आणि माझ्यासोबत अनिल देशमुख इथे नाहीत. हे आतापर्यंत घडले नव्हते. गेली अनेक वर्षे आपण एकत्रितपणे काम करतो. नागपूर जिल्हा, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या सगळ्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेला आणि कार्यकर्त्यांना शक्ती देण्याची जबाबदारी अत्यंत समर्थपणे अनिल देशमुखांनी सांभाळली.

- Advertisement -

केंद्र सरकार हे एखाद्या राज्यात सत्ता मिळाली नाही तर सत्तेचा गैरवापर करून त्या राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असते. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक सरकार उभे करण्यात आपल्याला यश मिळाले. या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा सहभाग आहे. राज्याला स्थिर कारभार देऊन प्रगतीच्या मार्गाकडे न्यायचा निर्णय आम्ही घेतला. पण काही लोकांना हे पटत नाही. काहींच्या हातून सत्ता गेल्याने त्यांच्यात एक अस्वस्थता निर्माण झाली आहे. यातूनच दिल्लीच्या मदतीने इथले राज्य कसे घालवता येईल यासाठी अखंड प्रयत्न सुरू केलेले दिसत आहेत. त्याची सुरुवात म्हणून सरकारमधील नेत्यांचा वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांचा वापर करून एकप्रकारे छळवाद करण्याचे काम सुरू असल्याचे पवार म्हणाले.

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत शरद पवार म्हणाले की, दोषारोप होताच अनिल देशमुख माझ्याकडे आले आणि दोष लागल्यामुळे मी सत्तेत बसणार नाही हा निर्णय घेतला व त्यांनी राजीनामा दिला. हे कशामुळे घडले तर एका माजी आयुक्तांमुळे घडले. आता हे आयुक्त आहेत कुठे? तुम्हाला तोंड दाखवायची ज्यांची तयारी नाही असे अधिकारी बाहेर आहेत आणि अनिल देशमुख आत आहेत. देशमुखांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. राज्य चालवायचे असते ते दिलदारपणे. सत्तेचा वापर करायचा सन्मानाने. सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे. मात्र, ज्यांचे पाय जमिनीवर राहात नाहीत व सत्ता डोक्यात जाते त्यांच्या हातून सत्ता गेल्यावर असे घडते, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

राज्यातील नेत्यांवर आरोप करणार्‍या माजी खासदार किरीट सोमय्यांवर शरद पवारांनी निशाणा साधला आहे. काही अस्वस्थ लोक याद्या तयार करून दिल्लीला पाठवतात आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करतात, असे पवार म्हणाले. राज्यातील सरकार आपल्या हातून गेले म्हणून काही करता येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे त्रास देणे, अटक करणे, बदनामी करणे हे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. तुम्ही कितीही छापे मारा आज ना उद्या ही सगळी शक्ती सामान्य माणसांचा पाठिंबा घेऊन कधीही तुम्हाला राज्यात सत्तेत येऊ देणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -