घरमहाराष्ट्रसौ सुनार की... एका वादाने दिला सर्व राजकीय 'तू तू मैं मैं'ला...

सौ सुनार की… एका वादाने दिला सर्व राजकीय ‘तू तू मैं मैं’ला धोबीपछाड!

Subscribe

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर विविध नाट्यमय घडामोडी घडू लागल्या. त्यामुळे ही भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात फारसा प्रभाव राहू नये, यासाठी हा प्रयत्न आहे का, असा प्रश्न सोशल मीडियावरून उपस्थित करण्यात येत होता. पण आता खुद्द राहुल गांधी यांनीच एका नव्या वादाला तोंड फोडल्याने ‘सौ सुनार की…’ असे चित्र उभे राहात आहे.

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रेला 7 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. दोन महिन्यांनी म्हणजेच 7 नोव्हेंबरला या यात्रेने महाराष्ट्रात प्रवेश केला. त्याच दिवशी चर्चेत आले ते शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरले आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. त्यानंतर ‘हर हर महादेव’ चित्रपटाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध, आमदार जितेंद्र आव्हाड यांना आधी अटक नंतर त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल होणे, त्यातून त्यांना जामीन मिळणे या सर्व घडामोडी घडल्या.

- Advertisement -

त्याशिवाय, गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने अटक केलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची जवळपास 100 दिवसांनी जामिनावर मुक्तता, साताऱ्यातील प्रतापगडाजवळील अफझल खानच्या कबरीजवळचे अतिक्रमण हटवणे, दीपाली सय्यद यांची शिंदे गटात जाण्याची घोषणा, जगदंब तलवारीची इंग्लंडकडे मागणी करण्याची भूमिका… अशा एक ना अनेक घटनांची चर्चा सोशल मीडियावर रंगली. दक्षिणेकडील राज्यांमध्ये भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात त्याचा प्रभाव राहू नये, यासाठी हे सुरू आहे का, असा निष्कर्ष काहींनी काढला होता.

पण खुद्द राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी वाशिम येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वक्तव्य केले. तर, आज त्यांनी पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्राची प्रतच त्यांनी सादर केली. त्यावरून भाजपा, शिंदे गट, मनसे तसेच इतर काही संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ही यात्रा महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यात असताना हा मुद्दा उपस्थित करण्याचे प्रयोजन काय, यावर आता तर्कवितर्क मांडले जात आहेत. एकूणच या नव्या वादाने अन्य घटनांवरील चर्चा बाजूला पडल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -