घरमहाराष्ट्रमढ मार्वेतील स्टुडिओ उभारण्यात एक हजार कोटींचा घोटाळा, सोमय्यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

मढ मार्वेतील स्टुडिओ उभारण्यात एक हजार कोटींचा घोटाळा, सोमय्यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Subscribe

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, शिवसेना खासदार संजय राऊत यांना तुरुंगात टाकल्यानंतर किरीट सोमय्या यांनी काल अनिल परबांविरोधात माहिती दिली होती. अनिल परब यांचा रिसॉर्ट लवकरच तुटणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मढ मार्वे येथील सीआरझेड जमिनीवर अनधिकृत स्टुडिओच्या बांधकामाला तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांनी परवानगी दिली होती, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच, त्यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे होते, त्यामुळे आदित्य ठाकरेंवरही किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. त्यासाठी भाजपच्या किरीट सोमय्या, आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी यांनी मढ मार्वे येथील स्टुडिओची पाहणीही केली. यावेळी महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. तसेच, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

मढ मार्वे येथे स्टुडिओ बांधण्यात आला आहे. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून हा स्टुडिओ बांधण्यात आला असून या प्रकल्पात जवळपास एक हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या स्टुडिओची पाहणी अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी केली होती, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

- Advertisement -

मुंबईत मढ इथे पाच स्टुडिओ उभारून एक हजार कोटींचा घोटाळा झाला. समुद्रात स्टुडिओ उभारले पण ही जागा समुद्रापासून दूर असल्याचं कागदोपत्र दाखवण्यात आलं. २०१९ मध्ये या जागेवर काहीही नव्हतं. पण २०२१ मध्ये तिथं स्टुडिओ उभारण्यात आला. पर्यावरण खात्यानं ६ महिन्यांसाठी सेट उभारण्याची परवानगी दिली होती. पण कांदळवन तोडून स्टुडिओ उभारले गेले. अस्लम शेख यांच्या आशिर्वादाने घोटाळा झाला. या जागेवर आदित्य ठाकरेंनीही भेट दिली होती, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

आरेतील जंगलतोडीवरून आदित्य ठाकरेंनी रान उठवले होते. पर्यावराणाचा दाखला देत त्यांनी वृक्षतोडीवरून भाजपावर टीका केली होती. मग हेच पर्यावरण प्रेम मढ मार्वेतील स्टुडिओला परवानगी देताना कुठे गेलं असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -