घरमहाराष्ट्रदिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात राजकीय फटाके !

दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात राजकीय फटाके !

Subscribe

२१ ऑक्टोबरला मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल, महाराष्ट्रासह हरयाणात निवडणूक जाहीर

भाजपमध्ये सुरू असलेली मेगाभरती आणि भाजप-शिवसेनेची युती होण्याची शक्यता असलेल्या वातावरणात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार या मिलियन डॉलर प्रश्नाचे उत्तर अखेर शनिवारी मिळाले. दिवाळीचे फटाके वाजण्यापूर्वीच राज्यात निवडणुकीचे फटाके वाजणार असून सत्तासुंदरीचा विवाहही पार पडणार आहे. सत्तासुंदरी कुणाला वरमाला घालते हे आता पहावे लागेल.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून महाराष्ट्र आणि हरयाणात 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होईल. तर निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शनिवारी दिल्लीत याची घोषणा केली. त्यामुळे शनिवारपासूनच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली.

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी तर हरयाणाच्या 90 जागांसाठी मतदान होईल. दोन्ही राज्यात शनिवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात ८.94 कोटी मतदार असून 1.8 लाख ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया 2 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली.

लोकशाहीतील सर्वात मोठ्या महोत्सवाचे मी स्वागत करतो. प्रत्येक महाराष्ट्रीय बंधू आणि भगिनींनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. प्रत्येक मत महत्वाचे आहे आणि ते अमूल्य आहे. आपले मत ही विकास प्रक्रियेतील फार मोठी शक्ती आहे.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

- Advertisement -

पुन्हा मीच मुख्यमंत्री

निवडणुका जाहीर होताच फडणवीस यांचा गजर

महाराष्ट्रात निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय पक्ष आपापल्या विजयाचे दावे करू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. युतीबाबतच्या तर्कवितर्कांना आलेल्या उधाणाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी भाजप-शिवसेना निश्चितपणे एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले. मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते.

आतापर्यंत शिवसेना महाराष्ट्रात भाजपसोबत समान जागांवर लढण्यावर अडून होती, पण आता १२६ जागांवर राजी होताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप १६२ जागा जिंकू शकते. मात्र आपल्या लहान मित्रपक्षांनाही भाजप जागा देणार आहे. एकीकडे भाजपने सत्तेचा दावा केला आहे तर काँग्रेसचे म्हणणे आहे की जनता भाजपला सत्तेबाहेर काढण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, ‘राज्यात शेतकरी चिंतेत आहेत.

आत्महत्येचे सत्र सुरू आहे. आम्ही सत्ताबदलाची वाट पाहत आहोत. हरयाणातही लोक भाजपला सत्तेपासून दूर ठेवतील.’ मुख्यमंत्री नाही, मात्र उपमुख्यमंत्रीपद भाजप शिवसेनेला देऊ शकते. आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या शक्यतेबाबत विचारले असता त्यांचे राजकारणात स्वागतच आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -