घरमहाराष्ट्रकरोनानंतर काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप - चंद्रकांत पाटील

करोनानंतर काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप – चंद्रकांत पाटील

Subscribe

राज्यात सध्या करोनाचे संकट असताना बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. करोनाचे संकट संपल्यानंतर काँग्रेसमध्ये देशपातळीवर आणि राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. काँग्रेसचे दोन तरुण नेते आणि एक ज्येष्ठ नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले. एका खासगी वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे.

काँग्रेस नेतृत्व नाराज –
केंद्रातील काँग्रेस नेतृत्व महाराष्ट्र काँग्रेसवर नाराज असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. करोनामध्ये काँग्रेसचे राज्यात अस्तित्व दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हेच पिक्चरमध्ये आहेत. आता टोपेही दिसत नाहीत, असा चिमटा काढतानाच काँग्रेसचे देशपातळीवर नाहीतर, राज्यपातळीवरही अस्तित्व उरलेले नसल्याची त्यांनी टीका केली. बाळासाहेब थोरात तुम्ही सांभाळा, तुमचा पक्ष जपा, तुम्हाला कुठेही भवितव्य नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसला जपता आले नाही तर इतरांना काँग्रेस काय सांभाळणार अशी टीका देखील त्यांनी केली.

- Advertisement -

खडसेंवरही टीका-
विधान परिषदेचे तिकीट न मिळाल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज झाले आहेत. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी टीका करत भाजपा हा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेऊन काम करतो. आमच्या अजेंड्यामध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशाच कार्यपद्धती. हा आमच्या अजेंड्याचा भाग आहे. केवळ कुटुंबातील लोकांनाच मोठे करणे हा आरएसएसचा अजेंडा नसल्याचे त्यांनी सांगत एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. तसेच चार तिकिटे असताना ४० जण इच्छुक अशी स्थिती आहे. त्यामुळे काही जणांना न्याय मिळतो, त्याचवेळी काही जणांवर अन्यायही होतो, असे देखील ते म्हणाले.

…तर खडसेंचे काँग्रेसमध्ये स्वागत करू – बाळासाहेब थोरात

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याला काँग्रेसने देखील दुजोरा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना खुली ऑफर दिली असून, जर एकनाथ खडसे काँग्रेसचे विचार घेऊन येत असतील तर त्यांचे निश्चित स्वागत करू, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

- Advertisement -

खडसे समर्थ नेते –
एकनाथ खडसे हे एक समर्थ नेते आहेत. त्यांना मी 1990 सालापासून ओळखतो. नाथाभाऊ म्हणाले की, मी त्यांना संपर्क केला होता. ते माझे जुने मित्र आहेत. आम्ही 1990 पासून विधानसभेत एकत्र आहोत. खडसे हे जनमानस असलेले नेते असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणालेत. त्यामुळे जर ते काँग्रेसचे विचार स्वीकारुन आमच्यासोबत येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे थोरात यांनी सांगितले.

काय म्हणाले होते खडसे –
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती. भाजपच्या 6 ते 7 आमदारांनी देखील क्रॉस वोटिंग करण्याचे माझ्याकडे मान्य केले होते, असा गौप्यस्फोट खडसे यांनी करत मी काँग्रेसची ऑफर नाकारत काँग्रेसकडून उभे राहण्यास नकार दिल्याचे सांगितले होते. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या निवड समितीने ज्या इच्छुकांच्या नावांच्या शिफारशी केल्या होत्या, त्यात आता ज्या चार जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यांची नावे नव्हती. त्यात माझ्यासह इतर तिघांची नावे होती. मात्र, निवड समितीने आमची नावे टाळून नव्या लोकांना उमेदवारी दिली, असे खडसे यांनी सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -