घरताज्या घडामोडीविनाअनुदानित शाळेतील ५० हजार शिक्षकांना तात्काळ मदत द्या, दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विनाअनुदानित शाळेतील ५० हजार शिक्षकांना तात्काळ मदत द्या, दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Subscribe

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची परिस्थिती भीषण आहे, त्यांना थोडी का होईना पण तात्काळ मदत करण्याची आवश्यकता

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा मागील दीड वर्षापासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद असल्यामुळे विनाअनुदानित शाळेत शिकवणाऱ्या एकूण ५० हजार शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे या शिक्षकांना शेतमजूरी आणि मिळेल ते काम करावं लागत आहे. कुटुंबीयांचे अनेक हाल होत असल्याची व्यथा या शिक्षकांनी मांडली आहे. यामुळे राज्य सरकारने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना तात्काळ मदत करावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तात्काळ मदत करण्याची विनंती केली आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, सद्यस्थितीत राज्यांमध्ये ५०००० पेक्षा जास्त शिक्षक विनाअनुदानित शाळेत आहेत. निवडणुकीपूर्वी आघाडीतील घटक पक्षांनी सत्तेवर आल्यास अनुदान देऊ असे आश्‍वासन दिल्याने, अनुदान मिळेल या आशेवर शिक्षक होते. मागील १५ महिन्यांपासून शाळा बंद आहेत, त्यामुळे शिक्षकांना जे तुटपुंजे वेतन मिळायचे ते देखील बंद झाले आहे. शिक्षणासारखे पवित्र ज्ञानदानाचे काम करूनही, ५०००० कुटुंबांवर उपाशी राहण्याचो वेळ आली आहे. काल काही माध्यमांनी याची दखल घेत बातमी केली, त्यावेळी असे लक्षात आले की तब्बल ५०,००० कुटुंब आज उघड्यावर आली असल्याचे प्रवीण दरेकर यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

- Advertisement -

शिक्षक दिवसभर टेप विकतो

घटनेची तीव्रता लक्षात घेऊन काल मी स्वतः औरंगाबाद जवळील बिडकीन येथे जाऊन काही शिक्षकांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी सांगितलेले वास्तव धक्कादायक होते. अनेक शिक्षक शेतमजूर म्हणून काम करतात. काहींना तेही मिळत नसल्याने, जे मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करतात, एक शिक्षक दिवसभर टेप विकतो. लॉकडाऊनमुळे काम मिळणेही दुरापास्त झाल्याने आम्ही पण आत्महत्या करावी का? अशी व्यथा एका शिक्षकांनी व्यक्‍त केली. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची परिस्थिती भीषण आहे, त्यांना थोडी का होईना पण तात्काळ मदत करण्याची आवश्यकता आहे. काल माणुसकी म्हणून मी दोन शिक्षक बांधवांना मदत केली, परंतु सर्वांना मदत करण्याची जबाबदारी शासनाची आहे. शिक्षणासारखे पवित्र काम करणार्‍यांचा उपासमारीमुळे मृत्यू होऊ नये, याकरीता टप्याटप्याने का होईना, परंतु तात्काळ अनुदान देण्याबाबत निर्णय घ्यावा.

- Advertisement -

कुटुंबाला तातडीने मदत करावी

राज्य सरकारचा हा निर्णय होईपर्यंत या ५० हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता प्रत्यक्ष शाळा सुरु होणे अपेक्षित नाही. त्यामुळे शाळा सुरु होईपर्यंत बिनाअनुदानित शाळेतील ५० हजार शिक्षकांच्या कुटुंबाला तातडीने मदत करावी अशी विनंती भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -