घरमहाराष्ट्रPM Modi Mumbai Visit : ते आले... त्यांनी पाहिलं अन् प्रत्येकवेळी मुंबईकरांना जिंकलं...

PM Modi Mumbai Visit : ते आले… त्यांनी पाहिलं अन् प्रत्येकवेळी मुंबईकरांना जिंकलं…

Subscribe

Narendra Modi Mumbai Visit | २०१४ ला लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेसचा धुव्वा उडवल्यानंतर पंतप्रधानांनी सातत्याने देशभर दौरे केले आहेत. त्यामध्ये त्यांचे मुंबईचे दौरे नेहमीच चर्चेत राहिले. 

PM Modi Mumbai Visit | मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले होते. जवळपास ३८ हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी आज पहिल्यांदाच मुंबई दौरा केला. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी अवघी मुंबईपुरी सज्ज झाली होती. जागोजागी बॅनर्स, पोस्टर्स, कटआऊट लावण्यात आले होते. मुंबईच्या विविध विकासकामांसाठी ते आले असले तरीही मोदींचे याआधीचेही सर्व मुंबई दौरे असेच गाजले आहेत. २०१४ ला लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेसचा धुव्वा उडवल्यानंतर पंतप्रधानांनी सातत्याने देशभर दौरे केले आहेत. त्यामध्ये त्यांचे मुंबईचे दौरे नेहमीच चर्चेत राहिले.

शिवसेनेत २१ जून २०२२ रोजी बंडखोरी झाली. या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. या सरकार स्थापनेच्या १५ दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. म्हणजेच, १४ जून २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. मुंबईतील राजभवन येथील क्रांतिकारी गॅलरीचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं. मोदींचा हा दौरा संपताच सात दिवसांनी शिवसेनेत बंडखोरी झाली आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं.

- Advertisement -

भारताची गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताच्या शान असलेल्या लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मोदींनी शोक व्यक्त करत मुंबईत अंत्यसंस्कारासाठी येत असल्याचं जाहीर केलं होतं.

दरम्यान, २०२०, २०२१ आणि २०२२ च्या मध्यापर्यंत कोरोना संसर्गामुळे प्रवासावर निर्बंध आले होते. कोरोना प्रतिबंधक नियमानुसार मोदींचे या काळात अगदी कमी दौरे झाले. खबरदारीचा उपाय म्हणून ते मुंबईतही आले नव्हते. पंरतु, त्याआधी २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचे मुंबई दौरे वादळी ठरले.

- Advertisement -

१८ ऑक्टोबर २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी बीकेसीत जाहीर सभा घेतली. मतदारांना आकर्षित करण्याकरता त्यांनी विविध आश्वसानेही दिली. या दौऱ्यांत त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागात प्रचाराचा धडाका लावला. शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी युतीतून ही २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, निकाल लागल्यानंतर दोन्ही गटांत मतभेद झाल्याने २५ वर्षांची युती तुटली आणि नाट्यमय घडामोडी घडत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.

मे २०१९ मध्ये देशभरात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पूर्ण तयारी केली होती. २०१४ पेक्षाही अतिविराट विजय त्यांना अपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी देशभरातील विविध लोकसभा मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या. यावेळी ते मुंबईतील बीकेसी मैदानावरही आले होते. बीकेसी मैदानावरून त्यांनी मुंबईतील नागरिकांना विकासाचा नारा देत मते मागितली. मोदींचा हा दौरा यशस्वी ठरला,  कारण भाजपाला या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं होतं.

२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होण्याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र दौरा केला होता. १८ डिसेंबर २०१८ रोजी कल्याण येथे मेट्रो कामाच्या पायाभरणीसाठी ते आले होते. कल्याण ते ठाणे व्हाया भिवंडी या मेट्रो ५ च्या एकूण ३३ हजार कोटींच्या कामाची पायाभरणी त्यांनी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबई येथील शिवस्मारकाचे २४ डिसेंबर २०१६ मध्ये भूमिपूजन झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते. या भूमिपूजनाला सात वर्षे लोटली तरीही स्मारकाची एकही विट अद्याप चढलेली नाही. यावरूनच विरोधकांनी आज मोदींच्या दौऱ्याला टार्गेट केलं आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पायाभरणी आणि मेट्रो कॉरिडॉरच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ ऑक्टोबर २०१५ रोजी मुंबईत आले होते. यावेळीही त्यांनी बीकेसी मैदानातून मुंबईकरांना संबोधित केले होते.

२०१४ मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. या दोन्ही निवडणुकांच्या प्रचारासाठी, उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. काँग्रेसची सत्ता उलथवून टाकत भाजपाने देशभरात सत्तांतर घडवून आणले. तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाच्या आणि परदेशी दौऱ्याची नेहमीच चर्चा होत असते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -