पुण्यातल्या करोना रुग्णांची संख्या वाढली! मुंबईतही व्हायरसचा शिरकाव?

Corona virus in china
करोना व्हायरस

आधी केरळ आणि नंतर दिल्लीमध्ये करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आता महाराष्ट्रात देखील करोना पसरतोय की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यामध्ये करोनाबाधित २ रुग्ण रविवारी सापडले होते. मात्र, आता त्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नुकतेच दुबईहून परतलेल्या एका दाम्पत्याला करोनाची लागण झाल्याचं आरोग्य चाचणीमध्ये निष्पन्न झालं होतं. आता या दाम्पत्याच्या मुलीला देखील करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच, मुंबई विमानतळावरून ज्या ओला कॅबमधून पुण्याला गेले, त्या कॅबच्या चालकाला देखील करोनाची लागण झाल्याचं आता समोर येत आहे. त्याशिवाय, या दाम्पत्याचा सहप्रवासी असलेला अजूक एक रुग्ण करोना बाधित झाला आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ५ वर पोहोचला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी ही माहिती दिली आहे. मात्र, हा चालक मुंबईचा असल्यामुळे आता मुंबईतही करोनाचा शिरकाव झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

पुण्यात एका दाम्पत्याला करोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. हे दाम्पत्य एकूण ४० जणांच्या गटासोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात दुबईला गेलं होतं. १ मार्चला हे दाम्पत्य मुंबई विमानतळावर परतलं. त्यांनी विमानतळावरूनच कॅब केली आणि ते पुण्याला गेले. त्यांच्यासोबत असलेले ४० सहप्रवासी देखील मुंबई विमानतळावरून महाराष्ट्रातील त्यांच्या त्यांच्या ठिकाणी परतले. मात्र, पुण्याला परतल्यानंतर या दाम्पत्याला करोना व्हायरसची लागण झाल्याचं रविवारी स्पष्ट झालं होतं. त्यानंतर आज सोमवारी या दाम्पत्याच्या मुलीला, त्यांनी जी कॅब केली होती, त्या कॅब चालकाला आणि त्यांच्या एका सहप्रवाशाला करोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हा कॅबचालक मुंबईचा असल्यामुळे आता मुंबईत देखील करोनाचा प्रसार होणार की काय? अशी भिती वर्तवली जाऊ लागली आहे.

आधी दुबईहून आलेल्या केवळ पती-पत्नीला करोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांच्यासोबत गेलेल्या त्यांच्या मुलीला देखील करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ते दुबईहून मुंबईला आल्यावर मुंबईहून पुण्याला कॅबने आले. त्या ओला कॅबच्या चालकालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्वांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या चौघांची स्थिती स्थिर आहे. त्यांना माईल्ड स्वरुपाचा करोना प्रादुर्भाव झाला आहे.

राजेश टोपे, आरोग्य मंत्री


वाचा सविस्तर – पुण्यातले करोना रुग्ण ४० लोकांसोबत दुबईला गेले होते!