घरमहाराष्ट्रऐकलं का? जगण्यायोग्य शहरांमध्ये पुणे अव्वल!

ऐकलं का? जगण्यायोग्य शहरांमध्ये पुणे अव्वल!

Subscribe

जगण्यायोग्य शहरांच्या यादीमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने देशातील जगण्यायोग्य, राहण्यायोग्य शहरांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये पुण्याने पहिला नंबर पटकावला आहे.

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. देशातील राहण्यायोग्य आणि जगण्यायोग्य शहरांमध्ये पुणे शहराने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नवी मुंबई आणि मुंबईने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा येण्याचा मान मिळवला आहे. शिवाय, ठाण्याने सहावा क्रमांक मिळवला आहे. आनंदाची बाब म्हणजे पहिल्या तिनही क्रमांवर महाराष्ट्रातील शहरांनी बाजी मारली आहे. पण, पहिल्या ५० शहरांच्या यादीमध्ये देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला मात्र स्थान मिळू शकले नाही. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने देशातील जगण्यायोग्य, राहण्यायोग्य शहरांची यादी जाहीर केली. त्यात पुण्यानं बाजी मारली आहे. एकूण आकडेवारी पाहता महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश जगण्यायोग्य असलेल्या देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये झाला आहे. ही देखील एक आनंदाची बाब म्हणावी लागेल नाही का?

दिल्ली ६५व्या स्थानी

या यादीमध्ये दिल्लीला ६५व्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधील एकाही शहराला पहिल्या दहामध्ये स्थान मिळालेले नाही. यामध्ये लक्ष वेधण्याची बाब म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या राजधान्यांचा पहिल्या दहा शहरांमध्ये समावेश आहे. कोलकाताने मात्र या सर्व्हेक्षणामध्ये भाग घेतला नव्हता. परिणामी, कोलकाताचा या यादीत समावेश करण्यात आले नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. शिक्षण, आरोग्य, आर्थिक घटक, पायाभूत सुविधा आदींचा विचार करून ही यादी तयार करण्यात आली आहे. या अहवालासाठी ४० लाख लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आल्याचे केंद्राने स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -