विखे-पाटील म्हणतात, ‘बाळासाहेब थोरातच भाजपमध्ये येणार होते’!

Radhakrishna-Vikhe-Patil-1-696x298
राधाकृष्ण विखे पाटील

एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या आधीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेशाच्या चर्चा जोरदार सुरू असतानाच आता विखे पाटलांनीच विद्यमान सरकारमधील एक मंत्री आणि काँग्रेसचे नगर जिल्ह्यातील वजनदार नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ‘काही वर्षांपूर्वी बाळासाहेब थोरात हेच भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते’, असा धक्कादायक दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या या दाव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं असून नगरमधील थोरात विरूद्ध विखे-पाटील या वादाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

नक्की काय म्हणाले राधाकृष्ण विखे-पाटील?

शिर्डीमध्ये पत्रकारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या चर्चित काँग्रेस पुन:प्रवेशाविषयी विचारणा केली असता त्यांनी उलट बाळासाहेब थोरात यांच्यावरच निशाणा साधला. ‘बाळासाहेब थोरातांना हे सगळं अपघातानं मिळालं आहे. त्यांचं स्वत:चं कर्तृत्व काहीही नाही. त्यांना स्वत:चा मतदारसंघ सोडून बाहेर जाता आलं नाही. नगरमध्ये १२ पैकी फक्त ३ जागा लढवता आल्या. त्यातही कसंबसं यश मिळालं. त्यामुळे त्यांनी माझ्या काँग्रेस प्रवेशाची चिंता करू नये. कारण २-३ वर्षांपूर्वी त्यांचाच भारतीय जनता पक्षात जाण्याचा विचार होता. ते कुठल्या नेत्याला भेटले हे मी सांगण्याची गरज नाही’, असा खळबळजनक दावा विखे पाटील यांनी केला आहे.

विखे-पाटलांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा

राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. २०१४च्या निवडणुकांच्या तुलनेत २०१९मध्ये नगरमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांनी विखे पिता-पुत्रांना त्यासाठी जबाबदार ठरवले. त्यामुळे भाजपमध्ये वाढत चाललेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर विखे-पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


वाचा सविस्तर – विखे पाटील भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार?