घरमहाराष्ट्रSanjay Raut : "रेल्वे भारताची संपत्ती, कोणाच्या...", भाजपाच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Sanjay Raut : “रेल्वे भारताची संपत्ती, कोणाच्या…”, भाजपाच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Subscribe

उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा आटोपल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीसोबत आणि नेते, पदाधिकारी यांच्यासोबत वंदे भारतने प्रवास केला. त्यांच्या या प्रवासावरून टीका करणाऱ्या भाजपाला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसाच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. त्यांचा हा दौरा काल (ता. 05 फेब्रुवारी) आटोपल्यानंतर ठाकरे दाम्पत्याने आणि त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्यांनी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला. त्यांच्या या प्रवासावर भाजपाकडूनच टीका करण्यात आली आहे. या टीकेला संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. रेल्वे ही भारताची संपत्ती आहे. कोणाच्या बापाची संपत्ती नाही, असे म्हणत राऊतांनी टीका करणाऱ्यांना सुनावले आहे. (“Railways are India’s wealth, whose…”, Sanjay Raut’s reply to BJP’s criticism)

हेही वाचा… Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या भाषणात 78 मिनिटे काँग्रेस-नेहरूंवर टीका, राऊतांनी भाजपाला सुनावले

- Advertisement -

कोकण दौरा आटोपल्यानंतर उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे खासदार विनायक राऊत, ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी खेड ते मुंबई असा प्रवास केला. परंतु, त्यांनी हा प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील वंदे भारत एक्सप्रेसमधून केला. ज्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. एकीकडे मोदींना विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र त्यांच्याच संकल्पनेतील वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करायचा, अशी चर्चा करण्यात येत आहे. हा प्रश्न प्रसार माध्यमांनी संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी खडेबोल सुनावले आहेत.

संजय राऊत म्हणाले की, रेल्वे ही भारताची संपत्ती आहे. कोणाच्या बापाची संपत्ती नाही. रेल्वे ही ब्रिटिशांनी निर्माण केली आणि काँग्रेसने वाढवली आहे. दोन-चार नवीन ट्रेन सुरू केल्याने त्या त्यांच्या मालकीच्या होत नाही. देश तुमच्या मालकीचा आहे का? रेल्वे ही देशाची सार्वजनिक मालमत्ता आहे. रेल्वे ही भाजपाची मालमत्ता नाही. त्यामुळे टीका करणारे मूर्ख लोक आहेत. त्यांना समुपदेशनाची गरज आहे, अशा कडक शब्दांत राऊतांनी प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

लवकरच पर्दाफाश करणार…

गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत हे सत्ताधारी आणि त्यांच्या भेटी घेत असलेल्या गुंडांचे फोटो पोस्ट करत आहे. याबाबत त्यांनी म्हटले की, ‘वर्षा’बंगल्यावर, मंत्रालयात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गुंड टोळ्या येऊन भेटत आहेत. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर याच भेटी होत आहेत. खून, दरोडे, अत्याचार अशा गुन्ह्यांसाठी आत असलेले, जामीनावर बाहेर आलेले हे गुंड आणि त्यांच्या टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतात? त्या गुंड टोळ्यांचा वापर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आपले मुख्यमंत्री करणार आहेत का? असा उपरोधिक प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.

अजित पवारांचे चिरंजीव एका गुंडाला भेटतात. मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गुंडांची रांग लागली आहे. कल्याणमध्ये आमदार गोळीबार करत आहेत. आज मी एक फोटो टाकला आहे, तसा मी रोज एक फोटो पोस्ट करणार आहे, असा इशाराच राऊतांनी यावेळी दिला. मुंबईतील एक माजी पोलीस अधिकारी या गुंडांच्या बैठका घडवून आणतो आहे, याचा लवकर मी पर्दाफाश करणार आहे, असेही त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -