Lockdown : राज ठाकरेंनी व्यक्तव्य मागे घ्यावे – रामदास आठवले

राज ठाकरे यांची गोळ्या घालण्याची भूमिका चुकीची असल्याचे आठवले म्हणाले.

दिल्लीमधील निझामुद्दीन येथील तबिलगी मरकजच्या कार्यक्रमावरून देशासह राज्यात संतापाची लाट सुरू असताना, मनसे अध्यक्ष राज यांनी मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे, अशी खास ठाकरे शैलीत टीका केल्यानंतर आता राज ठाकरे आपले व्यक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. तबलीगीवर कारवाई होणे आवश्यक आहे, मात्र गोळ्या घालण्याची भूमिका चुकीची असल्याचे आठवले म्हणाले. राज ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे अगदी बेकायदेशीर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला चिर देणारे आहे. तसेच अशा पद्धतीने गोळ्या मारण्याची भाषा इंग्रजांच्या काळामध्ये होती, पण आता आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा मी विरोध करतो. यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

नेमकं काय म्हणालेत आठवले

मरकजला गेलेल्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. लॉकडाऊन तर आहेच, पण त्यांना लॉकअपमध्ये टाकले पाहिजे. परंतु त्यांना गोळ्या घालण्याची ही भूमिका चुकीची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझी नम्र विनंती आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची गोळ्या मारण्याची भाषा योग्य नाही. राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा विरोध करतो. त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करु नयेत, त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे अशी नम्र सूचना रामदास आठवले यांनी केली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या एका भावनेशी सहमत असल्याचे सांगत तबलीगीमुळे कोरोना वाढलेला आहे. जवळजवळ तीस टक्के केसेस या मरकजला गेलेल्या तबलीगीमुळे वाढल्या आहेत. त्यांना शिक्षा झालेली आहे. त्यांनी काही मुद्दाम हा रोग पसरवला, असं म्हणता येणार नाही. मात्र ते एकत्र जमले, ही चूक आहे. त्यांनी अशा पद्धतीने लॉकडाऊन असताना कार्यक्रम पुढे ढकलायला हवा होता, असे मत आठवलेंनी व्यक्त केले आहे.