Maharashtra Covid 19 Restrictions : कोरोना निर्बंधमुक्तीचा आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सच्या चर्चेतूनच निर्णय – राजेश टोपे

महाराष्ट्र सरकारने कोरोना निर्बंध हटवण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील निर्बंध उठवल्यामुळे आता गुढीपाडव्याला मिरवणुका आणि शोभायात्रा काढता येणार आहेत. ७३६ दिवसांनंतर संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त झाला आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये आपण अनेक निर्बंध लागू केले होते. मात्र, ते निर्बंध मागे घेण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. कोरोना निर्बंधमुक्तीचा आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सच्या चर्चेतूनच निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्वांनी मिळून केंद्र सरकार, टास्क फोर्स, आरोग्य विभाग आणि इतर विभागासह चर्चा करूनच कोरोना निर्बंधमुक्तीचा निर्णय घेतला आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

हॉटेलमधील ५० टक्के उपस्थिती, बस,लोकल ट्रेन, मास्क आणि डबल व्हॅक्सीनेशन असावं, अशा प्रकारचे निर्बंध आता हटवण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांनी बिनधास्तपणे वावरावं. मात्र, ज्यांना मास्कचा वापर करायचा आहे त्यांनी करावा, नसेल त्यांनी नको, मास्कचा वापर हा ऐच्छिक असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

लोकांनी स्वतःची काळजी घेण्यासाठी मास्क घालावं पण ते ऐच्छिक असेल. शोभा यात्रा उत्साहात साजरा करता येईल. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदेखील उत्साहात साजरी करता येणार आहे. तसेच अन्य सण देखील मोठ्या उत्साहाने साजरे करता येणार आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार आणि टास्क फोर्सचे नियम बघूनच निर्णय घेतलल्याचं राजेश टोपे म्हणाले.


हेही वाचा : Maharashtra Covid 19 Restrictions : महाराष्ट्र निर्बंध मुक्त, राज्यातील सर्व निर्बंध उठवले ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय