घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रभडागे कुटुंबातील रक्षाबंधन यंदा ‘लष्करी थाटात’; भाऊ-बहीण झाले लष्करी अधिकारी

भडागे कुटुंबातील रक्षाबंधन यंदा ‘लष्करी थाटात’; भाऊ-बहीण झाले लष्करी अधिकारी

Subscribe

किशोर शिंदे । जेलरोड  

लष्करामध्ये नुकतीच फ्लाईंग ऑफिसर (Flying Officer)  म्हणून रुजू झालेली बहीण आणि लवकरच लष्करात लेफ्टनंट (Lieutenant) म्हणून रुजू होणार असलेल्या भावासाठी यंदाचा रक्षाबंधनाचा सण खास आहे. ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’, या उक्तीनुसार लष्करात अधिकारी झालेल्या या बहिण – भावाचे यंदाचे रक्षाबंधन केवळ फोनवरच होणार असले तरी ते जणू ‘लष्करी थाटात’ साजरे होणार आहे.

- Advertisement -

भारतीय वायुसेनेतून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले प्रशांत भडागे आणि देवळाली कॅम्प येथील काँटोन्मेंट बोर्डाच्या माध्यमिक शाळेत शिक्षिका असलेल्या अलका भडागे या पती-पत्नीची दोन्ही मुले अर्थातच मोठी मुलगी अपूर्वा ही मागील वर्षी एअर फोर्समध्ये ’फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून तर यावर्षी लहान मुलगा ऋतिक हा भारतीय सैन्य दलात ’लेफ्टनंट’ म्हणून निवडला गेला. नाशिक सारख्या शहरात महाराष्ट्रीयन कुटुंबातील एकाच परिवारातील दोन मुले अधिकारी करणार्‍या या भडागे कुटुंबात आजचा रक्षाबंधन हा सण हा खास म्हणावा लागेल.

खरेतर, अपूर्वा प्रशिक्षणात असल्याने तिला रजा मिळू न शकल्याने ती रक्षाबंधनला येणार नसल्याचे सांगताना ऋतिकचा स्वर थोडा हळवा झाला! मागील वर्षी देखील ताई प्रशिक्षणासाठी गेल्याने रक्षाबंधनला नव्हती. जुलैत ताई प्रशिक्षणासाठी गेली आणि ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनचा सण होता. आपण रक्षाबंधनासाठी नसणार हे लक्षात यताच ताई भावुक झाली आणि रडतच आमच्या दोन्ही भावांच्या गळ्यात पडली .ही आठवणी सांगताना ऋतिक आणि त्याचा भाऊ रोहन दोघेही भावनिक झाले. ताईने एक महिना अगोदर बांधलेली ती राखी मी आजही माझ्याकडे जपून ठेवली असल्याची आठवण ऋतिक सांगतो. देशासाठी लष्करी शिस्तीत राहताना अशा पद्धतीचे काही कटू प्रसंग सामोरे जावे लागते असेही ऋतिक ने सांगितले. कदाचित पुढील वर्षी मी प्रशिक्षणात असल्याने पुढची ही रक्षाबंधन आम्हाला साजरी करता येणार नसल्याची खंतही त्याने बोलून दाखवली! अर्थातच हे सांगताना ऋतिकच्या शब्दात व्याकुळतेपेक्षा देश प्रेमच अधिक जाणवत होते!

- Advertisement -

अपूर्वा जेलरोड स्थित ‘होली फ्लावर’ या शाळेत शिकली, तर ऋतिक हा ’के. एन. केला’ हायस्कूल येथे शिकला. अपूर्वाने एअर फोर्सची एएफसीएटी ही परीक्षा देऊन एएफएसपी परीक्षा उत्तीर्ण करून ती आज भारतीय वायुदलात ’फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून प्रशिक्षण घेत आहे. अर्थातच ती ‘पायलट’ नसून लढाऊ विमानांची अभियंता असणार आहे. तर ऋतिकने ‘सीडीएस’ ही परीक्षा उत्तीर्ण करून ’एसएसबी’ परीक्षा उत्तीर्ण केली आणि तो भारतीय लष्करात ‘लेफ्टनंट’ म्हणून निवडला गेला आहे.

सर्वसामान्य महाराष्ट्रीयन कुटुंब असलेले भडागे परिवार हा मूळचा पुणे येथील. धुळे येथे काही काळ त्यांचे वास्तव्य राहिल्याने धुळ्याशी ही त्यांचे ऋणानुबंध जुळले. पुढील काळ मुलांच्या आईच्या काँटोन्मेंट बोर्डातील शिक्षिकेच्या नोकरीनिमित्ताने त्यांना नाशिक येथे राहावे लागले. भारतीय लष्कराला आपण आपली दोन लेकरे दिलीत, आपल्याला कधी भीती वाटत नाही काय? असे विचारले असता, ’मी स्वतः लष्करात होतो आणि माझा मुलगा आणि मुलगी भारतीय लष्करात निवडली जाणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे, देशाला एकदा मुले दिली की फारसा विचार करायचा नसतो’, असे भडागे पती- पत्नीने अभिमानाने सांगितले!

उद्याचा रक्षाबंधनचा दिवस ताईच्या सुंदर आठवणींमध्ये घालवणार तिने लावलेल्या शिस्त आणि तिने केलेल्या प्रेमाला आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही हे ऋतिकने आवर्जून नमूद केले. ऋतिकचा जुळा भाऊ असलेला रोहन हा विविध स्पर्धा परीक्षा देत असून त्यानेही लवकरच अधिकारी होण्याची मनिषा बोलून दाखवली. ऋतिकशी बोलताना पदोपदी हे जाणवत होते की सात लाख मुलांमधून निवडल्या गेलेल्या त्या साडेतीनशे मुलांमध्ये ऋतिक आणि त्याची बहीण अपूर्व आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -