घरमहाराष्ट्रआगामी निवडणुकीत भाजपाने मनसेला सोबत घेऊ नये, रामदास आठवलेंची मागणी

आगामी निवडणुकीत भाजपाने मनसेला सोबत घेऊ नये, रामदास आठवलेंची मागणी

Subscribe

लोणावळा – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेने भाजपासोबत युती करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. येत्या पालिका निवडणुका आणि पुढील विधानसभा निवडणुकीसाठी मनसे भाजपा युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, भाजपाने मनसेला सोबत घेऊ नये असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलाय. ते लोणावळ्यात आरपीआयच्या (आठवले गट) राज्य कार्यकारणीच्या बैठकीत बोलत होते. 

येत्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आरपीआयचा झेंडा फडकणार असल्याचा निश्चय यावेळी रामदास आठवले यांनी बोलून दाखवला. तसंच, उद्धव ठाकरे यांचे मुंबईवरील वर्चस्व खालसा करण्यासाठी आरपीआय भाजपा आणि शिंदे गटाला सहकार्य करणार असल्याचीही भूमिका त्यांनी जाहीर केली.

- Advertisement -

‘धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याच्या भूमिकेला आमचा पाठिंबा नाही. धनुष्यबाण हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. शिंदे गटाकडे असलेले सध्याचं राजकीय संख्याबळ आणि संघटनेतील प्राबल्य पाहता धनुष्यबाणावर शिंदे गटाचाच अधिकार आहे. त्यामुळे चिन्ह त्यांनाच मिळेल’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

म्हणून मनसेला सोबत घेऊ नये

मनसेला सोबत घेतल्यास परप्रांतीय संदर्भातील भूमिकेचा राष्ट्रीय पातळीवर नकारात्मक संदेश जाईल, मनसेची परप्रांतीयांबद्दल असलेली भूमिका आम्हाला मान्य नाही. त्यामुळे त्यांना सोबत घेऊ नये.

- Advertisement -

उपमहापौर पदासाठी करणार मागणी

मुंबई महापालिकेवर भाजपा, शिंदे गट आणि आरपीयआची सत्ता आल्यास मुंबईच्या उपमहापौरपदासाठी आरपीआय मागणी करणार आहे. यासाठी एक व्यापक धोरण अवलंबणार असल्याचंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं. २१ सप्टेंबरला आरपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक होणार आहे. यासाठी देशातील विविध राज्यातील पदाधिकारी येणार असून राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

‘उद्धव ठाकरे यांच्या चुकीमुळेच शिवसेनेत फूट पडली आहे. जर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला नसता, तर शिवसेनेतील फूट टळली असती. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळेच त्यांना जबर धक्का बसला. अन् तो एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मात्र एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा निर्णय अगोदर दीड वर्षांपूर्वी घ्यायला पाहिजे होता. असे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहोरात्र राज्य व जनतेसाठी करत असलेले काम हे कौतुकास्पद आहे. त्यांनी शेतकरी व समाजाच्या हितासाठी घेतलेले निर्णय स्वागतार्ह आहे. तसेच १६ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय व विधानसभा उपाध्यक्षांनी काढलेला व्हिप हा बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -