रश्मी शुक्लांची फाइल पुन्हा उघडली, फोन टॅपिंगप्रकरणी नव्याने चौकशी होणार

रश्मी शुक्ला यांनी आम्हाला फोन टॅपिंग करायला लावलं होतं, असा धक्कादायक खुलासा पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी केला आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्याविरोधातील केस अधिक सक्षम झाली आहे.

पुणे – फोन टॅपिंगप्रकरणी पुन्हा एकदा नव्याने चौकशी करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रश्मी शुक्ला यांनी आम्हाला फोन टॅपिंग करायला लावलं होतं, असा धक्कादायक खुलासा पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी केला आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्याविरोधातील केस अधिक सक्षम झाली आहे.

हेही वाचा – रश्मी शुक्लांनी कोणाच्या आदेशाने फोन टॅप केले?

भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील फोन टॅपिंगच्या गुन्ह्याचा तपास (क्लोजर रिपोर्ट) बंद करण्याबाबत न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालाचे तीव्र पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले. हा अहवाल न्यायालयाने फेटाळून लावला असला तरीही यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट संबंध असल्याचा आणि याप्रकरणी रश्मी शुक्ला यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. कोणाच्या आदेशाने रश्मी शुक्लांनी फोन टॅप केले? आता त्यांना वाचविण्याचा कोण प्रयत्न करीत आहे, ही माहिती सभागृहासमोर आणण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. मात्र याविषयी स्थगन प्रस्ताव नाकारून बोलू न दिल्याने विरोधी पक्षाने सरकारचा निषेध करीत सभात्याग केला होता.

राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या काळात काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना खासदार संजय राऊत, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप करण्यात आले होते. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवला होता.

यानंतर पुण्याच्या बंडगार्डन आणि मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रश्मी शुक्ला केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून गेल्या. तरी याप्रकरणी पोलिसांनी त्यांना समन्स बजावून चौकशी केली. त्यामुळे शुक्ला यांच्यावर याप्रकरणी अटकेची टांगती तलवार होती.

परंतु शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच रश्मी शुक्ला यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तर मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर रश्मी शुक्ला यांना राज्य सरकारने याप्रकरणी क्लीन चिट दिली होती. या क्लीन चिटनंतर रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात सादर करण्यात आला होता.