घरमहाराष्ट्ररात्रीच्या अंधारात भाजपचा दरोडा

रात्रीच्या अंधारात भाजपचा दरोडा

Subscribe

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ जाहीरपणे लोकांसमोर का घेतली गेली नाही याचाच अर्थ हे पाप आहे. भाजपने रात्रीच्या अंधारात दरोडा घातला आहे, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून भाजपने राज्यात सरकार स्थापन केल्याने संतप्त झालेल्या खासदार राऊत यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भाजपने सत्ता, पद आणि पैशांचा गैरवापर केला. त्यासाठी राजभवनालाही सोडलं नाही. भाजपवाले अजित पवार यांची जागा ऑर्थर रोडमध्ये आहे, असं विधानसभेत सांगायचे. तीच धमकी देऊन त्यांनी अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार फोडले का याचा शोध घ्यावा लागेल. तसेच कदाचित मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकी अजित पवारांसोबत आर्थर रोडमध्ये घेण्याचेही ठरले असेल, असा टोला त्यांनी लगावला. भाजपच्या या राजकारणाला महाराष्ट्राची जनता योग्य उत्तर देईल, तसेच फुटिरांना फिरू देणार नाही, असा इशारा दिला.

- Advertisement -

अजित पवार यांच्यावरही टीका करताना राऊत म्हणाले, अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अपमान केला आहे. त्यांनी शरद पवारांना दगा दिला आहेच, पण महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अजित पवार हे आयुष्यभर तडफडत राहतील, असा घणाघात केला. यावेळी राऊत यांनी अजित पवारांबाबतचे निरीक्षणही मांडले. ते म्हणाले, कालपर्यंत अजित पवार आमच्यासोबत बैठकांमध्ये होते. पण चर्चेच्या वेळी ते कोणाच्याही नजरेला नजर मिळवत नव्हते. तेव्हाच त्यांच्या मनात काहीतरी काळंबेरं आहे असा संशय आला होता. पण ते असं काही करतील असं वाटलं नव्हतं.

ईडीच्या प्रकरणानंतर शरद पवारांची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. त्यावेळी अजित पवारांनी अचानक आमदारकीचा राजीनामा दिला. तेव्हाच त्यांच्याबद्दल संशय वाढला होता. त्यांनी या वयात शरद पवारांना दगा दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी शरद पवार यांचेही समर्थन केले. ते म्हणाले, अजित पवारांच्या निर्णयाशी शरद पवार यांचा काहीएक संबंध नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचं सकाळीच बोलणं झालं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -