घरमहाराष्ट्रनाशिकनिओ मेट्रो, कल्स्टर डेव्हलपमेंटचा आढावा थेट मुख्यमंत्री दरबारी

निओ मेट्रो, कल्स्टर डेव्हलपमेंटचा आढावा थेट मुख्यमंत्री दरबारी

Subscribe

दोन दिवसांत मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन

नाशिक : शहरात क्लस्टर योजना लागू करणे यांसह महापालिकेचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासंदर्भातील विविध प्रश्नांवर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. ७) ही बैठक होणार होती मात्र, महापालिकेचे अनेक विषय असल्याने आठवडाभरात पुन्हा मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन बैठकीची वेळ ठरविण्यात येणार आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर आता रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेत हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने कंबर कसली आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदी दादा भुसे यांची नियुक्ती झाल्यानंतर गेल्याच आठवड्यात भुसे यांनी पालिकेत बैठक घेत रखडलेल्या प्रश्नांसदर्भात आढावा सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मनुष्यबळाअभावी पालिकेतील कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त दबाव दूर होण्यासाठी नोकरभरती गरजेची असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शासनाकडे आकृतीबंध आराखडा पाठवला आहे. मात्र, तो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्याचप्रमाणे देशातील पहिल्या टायरबेस निओ मेट्रोला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असली प्रकल्पाचा नारळ अद्याप फुटलेला नाही. याबाबतही या बैठकीत चर्चा होईल. गेल्या पंचवार्षिक काळात घरपट्टीत सुमारे ५०० टक्क्यांनी वाढ केल्याने गृहखरेदी करणार्‍या नागरिकांना ३५ ते ४० हजार रुपये घरपट्टी भरावी लागत आहे. त्यामुळे घरपट्टी कराच्या दराचे पुनर्विलोकन करण्याची गरज आहे. त्याप्रमाणे शासनाच्या माध्यमातून ५० बेड्सचे अमरधाम बांधण्यासाठी शासनाकडून महापालिकेस निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. जुने नाशिक व पंचवटीतील जुन्या वाड्यांचा क्लस्टर डेव्हलपमेंट अंतर्गत चार एफएसआय देऊन सामुहिक विकास करण्यास राज्याने मंजुरी दिली आहे. मात्र, त्यापुढील कार्यवाही प्रलंबित आहे. सिडकोतील २८ हजार सदनिका फ्री होल्ड करण्याच्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही.

- Advertisement -

शहरातील झोपडपट्ट्यांसाठी एसआरए स्कीम राबवणे, नाशिकरोड विभागासाठी अडीचशे कोटी खर्चून पाणीपुरवठा योजना राबवणे, पूररेषा १० ते ५० मीटरच्या आत निश्चित करणे, चित्रमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकात चित्रनगरी उभारणे इ. विषयांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -