घरमहाराष्ट्रनाशिकयात्रेच्या आठवणी : 'मौत का कुआ'ची आजची शेवटचीच पिढी

यात्रेच्या आठवणी : ‘मौत का कुआ’ची आजची शेवटचीच पिढी

Subscribe

नाशिक : प्रत्येकाने मौत का कुआमधील स्टंट कधी ना कधी यात्रेत पाहिले असतील. हे स्टंट पाहताना नकळत श्वासाची गती वाढून आपल्याच मनात भीती निर्माण होते, तेव्हा या खेळाला मौत का कुआ का म्हणतात हे लक्षात येतं. सर्व कलाकार अक्षरशः जीवावर उदार होऊन स्टंट्स करतात. पोटासाठी सतत भटकंती करणार्‍या महिलांचं आयुष्य वाईट नजरा चुकवण्यात जातं. त्यामुळेच आपण जे सोसलं ते मुलांच्या नशिबी नको अशी या कलाकारांची भावना असल्याने आता पुढची पिढीच या क्षेत्रात येणार नाही आणि हा खेळ इतिहासजमा होईल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

कोणत्याही गावकडची जत्रा असली की त्यात मौत का कुआ नसेल तर नवल. या खेळाच्या नावातच थरार आहे. मात्र, त्यात स्टंट करणार्‍या कलाकारांना जीवावर उदार होऊनही असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. पूर्वी जशी मौत का कुआ पाहण्यासाठी हाऊसफुल गर्दी व्हायची तशी आता होत नाही. हीच उदासीनता या खेळासाठी मारक ठरतेय. त्यामुळे या खेळातला थरार काही वर्षच दिसणार आहे. मौत का कुआ खेळाचा संचालक मोहमद सलमान हा मूळचा दिल्लीचा आहे. तो सात वर्षांपासून या खेळात काम करत आहे. त्याचा हा वडिलोपार्जित व्यवसाय असून, या क्षेत्रात ही तिसरी पिढी आहे. यावरच त्याचा व कलाकारांचा उदरनिर्वाह चालतो. पावसाळ्यात या व्यवसायाला सर्वाधिक फटका बसतो.

- Advertisement -

या प्रवासाबद्दल मोहमद सलमान सांगतो की, नोटबंदीआधी मौत का कुआ पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी व्हायची. त्यामुळे चांगला व्यवसाय व्हायचा. मात्र, नोटबंदी आणि कोरोना काळात मौत का कुआं कोणत्याही यात्रेत आला नाही. परिणामी, या कलाकारांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचे जगणेही अवघड झाले होते. मौत का कुआसाठीचे प्रशिक्षण दिल्लीत मिळते. या ठिकाणी उस्ताद प्रशिक्षण देतात. दिल्लीत मौत का कुआसाठी लागणारे रबर, लाकूडसह इतर साहित्य मिळते. वयाच्या १४ व्या वर्षापासून स्टंट करत आहे. स्टंट करताना भीती वाटते. मात्र, पोटासाठी नाईलाजास्तव धोका पत्करावा लागतो. माझा आजवर चार वेळा अपघात झाला आहे. त्यात जखमीही झालो. पण पर्याय नाही, असे मोहमद सलमान याने सांगितले. मौत का कुआ या व्यवसायात १५ लोक कार्यरत आहेत. देशभरात कोणत्याही यात्रेत जाण्यासाठी त्यांच्या पगारासह निवास व भोजन व्यवस्था करावी लागते. त्यातून काही उरले तर नफा होतो. पाऊस झाला तर या व्यवसायाला सर्वाधिक फटका बसतो.

मौत का कुआमध्ये तीन कलाकार स्टंट सादर करतात. दोन बाईक व एक कार या खेळात असते. महिला कलाकारदेखील स्टंट करते. पूर्वीच्या आणि आताच्या स्टंटमध्ये कोणताही फरक झालेला नाही. पूर्वी या खेळात सुझुकी व यामाहा दुचाकी असयाची. आता बुलेटसुद्धा आहे. या व्यवसायात येवून चूक झाल्यासारखं वाटतं. मात्र, आता सवय झाली आहे. या व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. जे माझ्या नशिबी आले ते मुलांच्या नको. त्यामुळे या व्यवसायात मुलांना आणणार नसल्याचे संचालक मोहमद सलमान यांनी सांगितले.

- Advertisement -

पोटासाठी जीवघेणा स्टंट, लग्नानंतर हे क्षेत्र नकोच : दिव्या सोळंकी

मौत का कुआमध्ये पाच वर्षांपासून जीवावर उदार होवून स्टंट करत आहे. आतातर कारमध्येही स्टंट करतो. या व्यवसायात मी मैत्रिणीमुळे आले. तीसुद्धा बाईकवर स्टंट करते. तिच्यासोबत दोन-तीनवेळा मौत का कुआंमध्ये आले. तेव्हापासून स्टंट करते. स्टंटसाठी कुटुंबाचासुद्धा पाठिंबा लाभला. स्टंटमध्ये जीवाचा अधिक धोका असतो. पण, देवावर विश्वास आहे. देव आपल्याला सुरक्षित ठेवेल. स्टंट करतेवेळी खूप भीती वाटते. सुरुवातीला दोन-तीन वेळा चक्कर आले. त्यानंतर सवय झाली. घरची आर्थिक परिस्थिती खराब असून, आई दुसर्‍याच्या घरी काम करते. या व्यवसायातून मिळालेल्या पैशातून घर घेतले, दोन लहान भावांचे शिक्षण करत आहे. मौत का कुआमध्ये स्टंट करताना कारचे चाक निखळल्याने कार उलटून अपघात झाला होता. स्टंट करण्यापूर्वी खबरदारी घेण्याबाबतचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे अपघाताची जाणीव होताच कारमध्ये बसते. त्यामुळे अपघात झाला तेव्हा गंभीर जखमी होण्यापासून वाचले. गंभीर अपघात झाला तर घरी बसावे लागेल आणि पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल. मौत का कुआमध्ये जीवाला धोका अधिक असल्याने आई व वडिलांना स्टंट केलेले आवडत नाही. त्यावेळी फक्त स्टेजवर बसायचे असते, असे सांगत त्यांना आधार देते. त्यांना मौत का कुआंमध्ये स्टंट कशी करते, ते सांगत नाही. मौत का कुआ केरळ, तमिळनाडू, चेन्नई, हैद्राबाद, गुजरात, राजकोटसह देशभरातील यात्रांमध्ये जातो. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मौत का कुआमध्ये स्टंट करणे चांगले आहे. कारण समाजातील वेगवेगळ्या प्रकारची माणसे काहीही बोलतात. त्यामुळे आता लग्नानंतर हे क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांचे ऐकले तर आपल्या पोटाचा प्रश्न निर्माण होईल. : दिव्या सोळंकी, मुंबई

 

मौत का कुआंमधून यात्रेत येणार्‍या भाविकांचे मनोरंजन केले जाते. पोटासाठी जीवावर उदार होवून स्टंट केले जातात. मात्र, लोक वाईट नजरेने पाहतात. या क्षेत्रात भविष्यात काम करणार नाही. नोकरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार आहे. : संगीता प्रजापती, कलाकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -