घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी? - शिवसेना

महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी? – शिवसेना

Subscribe

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आलं आहे. दिवसागणिक होत असलेला रुग्णवाढईचा विस्फोट, अपुऱ्या लसी यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या नव्या स्टेनची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन हा एकमेव उपाय असल्याचं ठाकरे सरकारचं मत आहे. मात्र, याला भाजपने विरोध केला आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर सामान्य जनतेच्या मदतीसाठी एखादं पॅकेज जाहीर करावं, असं भाजपने म्हटलं आहे. भाजपच्या या भूमिकेचं शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून चांगलाच समाचार घेतला आहे.

“१५ एप्रिलनंतर राज्याची कोरोना स्थिती गंभीर होईल असे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेच जेव्हा सांगतात तेव्हा त्याचे गांभीर्य विरोधी पक्षाने समजून घेतले तर बरे होईल. ‘अर्थचक्र की अनर्थचक्र?’ यावर तत्काळ निर्णय घ्यायलाच हवा. लोकांना समजावण्याचे काम जसे सरकार पक्षाचे आहे तसे विरोधी पक्षाचेही आहे. केंद्र सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही, पळ काढता येणार नाही. राज्यातील विरोधी पक्षाने दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची ही बाजू भक्कमपणे मांडली तर राज्यहिताचे श्रेय त्यांनाच मिळेल,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

- Advertisement -

दुसरा पर्याय असेल तर फडणवीसांनी सांगावा

“महाराष्ट्रात कडक लॉक डाऊन लावावेच लागेल असे संकेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. विरोधी पक्षाला लॉक डाऊनमुळे लोकांचे अर्थचक्र बिघडेल अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे, पण सध्या माणसांचे प्राण गमावण्याचे जे ‘अनर्थचक्र’ सुरू आहे ते थांबवायचे तर कडक लॉक डाऊन आणि निर्बंध अपरिहार्य असल्याचे मुख्यमंत्र्यांचे सांगणे आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीस उपस्थित होते. फडणवीस व त्यांच्या पक्षाचे लॉक डाऊनसंदर्भात वेगळे मत आहे. लॉक डाऊन नकोच, तसे काही झाले तर लोकांचा उद्रेक होईल असे जे फडणवीस म्हणतात त्यात अजिबात तथ्य नाही असे नाही, पण कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असेल तर लॉक डाऊनशिवाय पर्याय नाही. आता त्याऐवजी दुसरा काही पर्याय असेल तर फडणवीस यांनी सांगावा,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी?

नोटाबंदी, लॉक डाऊन या विषयाची ओळख पंतप्रधान मोदी यांनी देशाला करून दिली आहे. भ्रष्टाचाराची साखळी तुटावी म्हणून नोटाबंदी व कोरोना संक्रमणाची साखळी तुटावी म्हणून मोदी यांनी लॉक डाऊनची घोषणा एक वर्षापूर्वी केली होती तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी त्या निर्णयाचे थाळय़ा वाजवून स्वागत केले. आज कोरोनाची परिस्थिती आधीपेक्षा जास्त गंभीर झाली आहे याचे भान महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ठेवले तर जनतेवर उपकार होतील. महाराष्ट्रात शनिवारी ५९,४११ इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, ३०९ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसारखी ठिकाणे हॉटस्पॉट बनली. देशातला कालचा आकडा दीड लाखावर गेला. हे चित्र धक्कादायक आहे. त्यामुळे या संकटाकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेने का मोजावी? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राला सापत्न वागणूक

महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे, पण बाजूच्या गुजरातमध्ये लसीचा महापूर आहे. कोरोना काळात महाराष्ट्राचीच काय, देशाचीच अर्थव्यवस्था कोसळली हे मान्य करावेच लागेल, पण त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे केंद्राकडून काही राज्यांना मिळत असलेली सापत्न वागणूक. पृथ्वीराज चव्हाण यांनी परखडपणे सांगितले आहे की, महाराष्ट्राला पीपीई किटस्, एन-९५ मास्क आणि व्हेंटिलेटर अशी महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे पुरविण्यात सापत्न वागणूक देण्यात आली आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -