सचखंड एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा; ट्रेनमधून उतरण्यासाठी केला बनाव

गाडीतून लवकर उतरण्यासाठी या टवाळखोरांनी गाडीला आग लागल्याचा आरडाओरडा केला. त्यामुळे घाबरलेल्या इतर प्रवाशांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी गाडीच्या बाहेर उड्या मारल्या.

Sachkhand express
सचखंड एक्स्प्रेस

सचखंड एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरवल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. जालना ते बदनापूर रेल्वे स्थानका दरम्यान काही टवाळखोरांच्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गाडीतून लवकर उतरण्यासाठी या टवाळखोरांनी गाडीला आग लागल्याचा आरडाओरडा केला त्यामुळे घाबरलेल्या इतर प्रवाशांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी गाडीच्या बाहेर उड्या मारल्या. यामध्ये सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.

अमृतसर-नांदेड ही सचखंड एकसप्रेस नांदेडकडे येत होती. त्याच दरम्यान बदनापूरजवळ ट्रेनमधील काही टवाळखोरांना उतरायचे होते. मात्र बदनापूरजवळ ट्रेन न थांबल्यामुळे या टवाळखोरांनी ट्रेनला आग लागल्याचा बनाव करत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ट्रेनमधील प्रवासी घाबरले. त्यांनी इकडे तिकडे पळण्यास सुरुवात केली. तर काही प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. ट्रेन थांबली आणि सर्व प्रवाशांना धक्का बसला. कारण ट्रेनला आग लागलीच नसल्याचे त्यांना कळाले. मात्र तोपर्यंत ट्रेनला आग लागल्याची अफवा पसरवणाऱ्यांनी पळ काढला. या अफवेमुळे जवळपास अर्धातास ट्रेन एकाच ठिकाणी थांबून होती. त्यामुळे ट्रेनेचे वेळापत्रक कोलमडले आणि प्रवाशांना याचा त्रास झाला. जवळपास अर्धा तासानंतर ट्रेन नांदेडकडे रवाना झाली.