घरमहाराष्ट्रसंभाजीराजे उपोषणाच्या पावित्र्यात

संभाजीराजे उपोषणाच्या पावित्र्यात

Subscribe

२६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन

मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी दिला. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारकडून कोणतीच हालचाल होत नसल्यामुळे मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याचे संभाजीराजेंनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

मराठा समाजाला शिक्षण आणि शासकीय नोकरीत टिकणारे आरक्षण द्यावे, अशी सर्व पक्षांना माझी हात जोडून विनंती आहे. न्यायालयात मराठा आरक्षण कशामुळे गेले हे सांगितले. परंतु यासंदर्भात राज्य सरकारकडून काहीच हालचाल झाली नाही. आरक्षण रद्द झाल्यानंतर पुनर्विचार याचिका दाखल करा, असे देखील मी सांगितले होते. मात्र, सरकारने उशिराने पुनर्विचार याचिका दाखल केली. या याचिकेची काय परिस्थिती आहे, हे कोणालाच काही माहिती नाही. यासंदर्भात समिती स्थापन करा, असे माझे स्पष्ट मत असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

- Advertisement -

आरक्षण ५० टक्क्यांवर द्यायचे असेल तर त्यासाठी अपवादात्मक परिस्थिती असायला हवी, असे सर्वोच्च न्यायालयात म्हटले. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे. मराठा आरक्षणासाठी मी २००७ पासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. मराठा समाज वंचित घटक आहे. मी मराठा आहे, त्यामुळे मी मराठा आरक्षणासाठी लढत आहे, असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्तीचा पर्याय शक्य आहे. आरक्षणासाठी आपण महाराष्ट्र पेटवू शकतो. पण मला तसे करायचे नाही, असे स्पष्ट करताना मराठा आरक्षणाच्या अंतर्गत निवड झालेल्या तरुणांना नियुक्ती द्यायला काय हरकत आहे? असा सवालही त्यांनी केला.

- Advertisement -

कोपर्डीच्या खटल्याचा निकाल लागून अनेक वर्षे झाली. त्यावर पुढे काहीच कारवाई झाली नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना नोकरी देण्याची मागणी प्रलंबित आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या त्वरित सोडवल्या नाहीत तर २६ फेब्रुवारीपासून आपण पूर्णपणे अन्नत्याग करणार आहे. आझाद मैदानावर मी एकटा आमरण उपोषण करणार असल्याचे संभाजीराजेंनी यावेळी सांगितले.

संभाजीराजे यांच्या मागण्या
*मराठा आरक्षणामुळे २०१४ ते ५ मे २०२१ पर्यंतच्या शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी
*ओबीसीच्या धर्तीवर मराठा समाजाला सवलती लागू करा
*सारथी संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरू करावीत. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सारथी संस्थेची उपकेंद्र सुरू करून त्याठिकाणी शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत.संस्थेसाठी एक हजार कोटींची तरतूद करून तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करावा
*अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी मिळावा. लाभार्थी पात्रतेसाठी असलेल्या अटी शिथिल करत व्याज परताव्याची १० लाख रुपयांची मर्यादा वाढवून ती किमान २५ लाख रुपये करावी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -