घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात हे काय सुरू आहे? पत्रकार वारीसेंच्या मृत्यू प्रकरणी राऊतांचा फडणवीसांना सवाल

महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? पत्रकार वारीसेंच्या मृत्यू प्रकरणी राऊतांचा फडणवीसांना सवाल

Subscribe

पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापलं आहे. वारीसे यांचा अपघाती मृत्यू नसून ही पूर्वनियोजित हत्या असल्याचा आरोप कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केला आहे. हे प्रकरण आता विरोधी पक्षांनीही उचलून धरलं असून याची सखोल चौकशी करण्याची आणि आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहित महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? असा सवाल केला आहे. तसेच शशिकांत वारीसें यांच्या खुनाचे प्रकरण गांभीर्याने घ्यावे अशी मागणीही संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रातून केली आहे.

संजय राऊतांनी पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

राज्याचे गृहमंत्री म्हणून ढासळणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. आपल्यासारख्या प्रशासनाचा मोठा अनुभव असलेल्या नेत्याकडे गृह विभागाचे नेतृत्व असताना राज्यात दिवसाढवळ्या खून पडावेत व संबंधित गुन्हेगारांना राजाश्रय मिळावा, हे चिंताजनक आहे.

- Advertisement -

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील तरुण पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली. या हत्येस अपघाताचे स्वरूप दिले असले तरी ही हत्याच आहे. पत्रकार वारिशे हे कोकणात येऊ घातलेल्या रिफायनरीविरुद्ध सातत्याने आवाज उठवत होते. ते याबाबत लिखाण करीत होते व रिफायनरीचे समर्थक म्हणवून घेणारे गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना धमक्या देत होते. रिफायनरीस कोकणातील जनतेचा विरोध आहे. जरी आपले याबाबत वेगळे मत असले तरी स्थानिक जनता या रिफायनरीविरुद्ध संघर्ष करीत आहे व शशिकांत वारिशेसारखे पत्रकार रिफायनरीविरुद्ध लोकांना जागृत करीत होते, हे सत्य नाकारता येणार नाही. त्या वारिशे यांची हत्या होणे ही महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेस कलंक लावणारी घटना आहे. मी खालील दोन गोष्टींकडे अपले लक्ष वेधू इच्छितो.

- Advertisement -

१) ४ फेब्रुवारी २०२३ रोजी कोकणातील आंगणेवाडी जत्रेत भारतीय जनता पक्षाची एक जाहीर सभा झाली. त्या सभेत आपण ठासून सांगितले की, नाणार येथे रिफायनरी होणारच. कोण अडवतेय ते पाहू व आपल्या वक्तव्यास चोवीस तास उलटत नाहीत तोच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली. हा फक्त योगायोग समजावा काय?

२) महाराष्ट्रात घटनाबाह्य सत्तांतर झाल्यानंतर, रत्नागिरीचे राजकीय पालकमंत्री व त्यांच्या समर्थकांनी ” रिफायनरी विरोधकांना सरळ धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यासाठी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा, जिल्हाधिकारी यांना वापरण्यात आले. शशिकांत वारिशे यांच्यावर देखील पोलीस व इतर सरकारी यंत्रणांचा दबाव होता व रिफायनरीविरुद्ध भूमिका घेतली तर परिणाम भोगावे लागतील, असा सावधानतेचा इशारा देण्यात आला. आपल्या आंगणेवाडीतील भाषणाने रिफायनरी समर्थकांतील गुंड प्रवृत्तींना हिरवा झेंडाच मिळाला व वारिशे यांची हत्या झाली, असे आपणास वाटत नाही काय?

‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांसारखे ज्वलंत निर्भीड पत्रकार ज्या कोकणच्या भूमीत जन्मास आले त्याच भूमीत एका पत्रकाराची हत्या होणे धक्कादायक आहे.

याआधी विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ‘ईडी’, ‘सीबीआय’ व पोलीस यंत्रणेचा वापर होत असे, पण आता विरोधकांच्या हत्याच होऊ लागल्या हे चिंताजनक आहे.

कोकणात याआधी श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर अशा राजकीय हत्या झाल्या व राजकीय दबावामुळे मूळ आरोपी मोकाट राहिले. त्याच खुनी मालिकेत शशिकांत वारिशे यांचे हौतात्म्य जोडले आहे, हे मी आपल्याकडे नमूद करू इच्छितो.

वारिशे यांच्या हत्येचा निषेध मुंबई, दिल्लीसह जगभरातील पत्रकार संघटनांनी केला आहे. पण कोकणातील इतर खुनांप्रमाणे हे प्रकरण दडपले जाईल, अशी भीती असल्यानेच या खुनाची समांतर न्यायालयीन चौकशी व्हावी. तसेच शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना किमान ५० लाखांचे अर्थसहाय्य सरकारने करावे, अशी विनंती मी करीत आहे.

शशिकांत वारिशे यांच्या खुनाचे प्रकरण आपण गांभीर्याने घ्यावे. मी स्वतः तसेच शिवसेनेतील माझे प्रमुख सहकारी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी लवकरच रत्नागिरी- राजापूर येथे जात आहोत, याची कृपया नोंद घ्यावी.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -