वारसांना कर्तृत्व सिद्ध करावं लागतं; सत्यजित तांबे कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत

कॉंग्रेसमधून निलंबन केले जाणार असल्याच्या वृत्तावर सत्यजित तांबे यांनी कोणतीच प्रतिक्रिया सोमवारी दिली नाही. मात्र मंगळवारी त्यांच्या सोशल अकाऊंटमधून कॉंग्रेसचा उल्लेखच गायब झालेला दिसला. त्यामुळे सत्यजित तांबे कॉंग्रेसमधून बाहेर पडणार की कॉंग्रेस त्यांचे निलंबन करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

satyajeet tambe

नाशिकः कॉंग्रेसमधून निलंबनाची टांगती असणाऱ्या सत्यजित तांबे यांनी त्यांच्या डीपी व बायोमधून कॉंग्रेस पक्षाचा उल्लेख काढून टाकला आहे. वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व सिद्ध करावचं लागतं, असे सत्यजित तांबे यांनी लिहिले आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई होण्याआधीच सत्यजित तांबे यांनी कॉंग्रेस सोडण्याची तयारी केली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

जी माणसे माझ्या कठीण काळात माझ्याबरोबर असतील, त्यांना माझा शब्द आहे. माझा चांगला काळ तुमच्यासाठीच असेल, अशी पोस्टही सत्यजित तांबे यांनी लिहिली आहे. सोशल मिडियावरील कॉंग्रेसचे सर्व फोटो व अन्य तपशील सत्यजित तांबे यांनी काढून टाकला आहे. त्यामुळे तांबे यांच्या कॉंग्रेस सोडण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

विधान परिषदेची आचारसंहिता लागू होताच सत्यजित तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल, असा अंदाज होता. अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी डॉ. सुधीर तांबे हे काँग्रेस पक्षातर्फे अर्ज दाखल करतील, असा संदेशही त्यांनी निकटवर्तियांना दिला होता. जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज सादर करण्याचे नियोजन झालेले असताना ऐनवेळी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि सत्यजित तांबे यांच्या आग्रहापुढे सुधीर तांबे यांना सपशेल माघार घ्यावी लागली. त्यामुळे पक्षाने सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. सोमवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्याचवेळी सत्यजित तांबे यांच्या निलंबनाची सूचना कॉंग्रेस हायकमांडने केल्याचे सुत्रांनी सांगितले.

कॉंग्रेसमधून निलंबन केले जाणार असल्याच्या वृत्तावर सत्यजित तांबे यांनी कोणतीच प्रतिक्रिया सोमवारी दिली नाही. मात्र मंगळवारी त्यांच्या सोशल अकाऊंटमधून कॉंग्रेसचा उल्लेखच गायब झालेला दिसला. त्यामुळे सत्यजित तांबे कॉंग्रेसमधून बाहेर पडणार की कॉंग्रेस त्यांचे निलंबन करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघांसाठी तर नाशिक, अमरावतीमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे.