घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टजालन्यात दानवेंसाठी खोतकर घेत आहेत 'मॅरेथॉन' प्रचार सभा

जालन्यात दानवेंसाठी खोतकर घेत आहेत ‘मॅरेथॉन’ प्रचार सभा

Subscribe

एक वेळ अशी आली की जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर बंडखोरी करतात की काय? अशी स्थिती निर्माण झाली. मात्र नंतर दानवेंसोबत दिलजमाई घडल्यानंतर त्यांना आधी कटट्टर विरोध करणारे खोतकरच त्यांच्यासाठी दिवसाला आठ ते दहा प्रचारसभा घेत आहेत.

‘रावसाहेब दानवे माझे मेहबुबा आहेत.. मी त्यांच्यावर प्रेम करतो ते माझ्यावर इश्क करतात.’ हे वक्तव्य आहे शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे. जालना जिल्ह्यातील एका प्रचारसभेत त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोरच केले. नुकतेच हे वक्तव्य केले आहे. हे तेच अर्जुन खोतकर आहेत. शुक्रवारी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर जालना जिल्ह्यातील भाजीपाला आणि प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या कडवंची गावी त्यांनी रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी सभा घेतली. आज दिवसभरात ते आठ ते दहा ठिकाणी विविध गावांत सभा घेणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. प्रत्येक सभेत ते रावसाहेब दानवे यांच्यावर स्तुतीसुमने उधळत असून मागील काही दिवसांपासून ते जालना मतदारसंघातील ग्रामीण भागात युतीच्या प्रचारासाठी सक्रीय झाल्याने मतदारांनाही आश्चर्य वाटत आहे.

कडवंची, जालना येथील प्रचारसभेत शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर

विरोधकांचे कडवे आव्हान

सध्या भल्या सकाळीच मंत्री अर्जुन खोतकर प्रचारासाठी बाहेर पडत असून सकाळी 7 पासूनच ते मोजपुरी, भिलपुरी, निरखेडा, धांडेगाव, माणेगाव खालसा इत्यादी विविध  गावांमध्ये सभा घेत आहेत. घरकुल योजनेसह, शेतकऱ्यांची पेंशन योजना, पुलवामा हल्ला अशा विविध बाबींवर ते बोलत आहेत. इतकेच नाही तर मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी रावसाहेब दानवे यांना निवडून देणे कसे महत्त्वाचे आहे, हेही मतदारांना पटवून देत आहेत.

- Advertisement -

यंदा जालना मतदारसंघात कॉँग्रेसचे उमेदवार विजय औताडे आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांचे आव्हान आहे. त्यामुळे मतदान तोंडावर आलेले असताना युतीच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना या ठिकाणी मेहनत करावी लागत आहे. याशिवाय मागील आठ दिवसांपासून उष्माघाताचा त्रासाने युतीचे उमेदवार खा. रावसाहेब दानवे हे रुग्णालयात दाखल होते. औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

त्यामुळे राज्यात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना ते उपस्थित राहू शकले नाहीत. नुकतेच त्यांना रुग्णालयातून घरी सोडले, त्यानंतर कालच्या अमित शहांच्या सभेला तेही हजर होते. पण त्यांची ही उणीव काही दिवसांपूर्वी त्यांना विरोध करणारे आणि आता दिलजमाई केलेल्या खोतकरांनी भरून काढली आहे. मतदारसंघातील सभांना ते हजेरी लावत आहेत. त्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवेंचे कौतुकही करत आहेत. त्यामुळे सेना भाजपा कार्यकर्ते आणि मतदारांसाठी हा विषय एकाच वेळी आश्चर्याचा आणि चर्चेचा ठरत आहे.

- Advertisement -

वाचा – मोदीविरोधात देशभरातले तर माझ्या विरोधात जालन्यातील चोट्टे एकत्र – रावसाहेब दानवे

वाचा – खोतकरांना उमेदवारी द्या, अन्यथा दानवेंना मदत करणार नाहीत – शिवसैनिक


दानवे-खोतकर वाद नक्की काय होता?

हे तेच अर्जुन खोतकर आहेत, ज्यांचा जालना लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारीला विरोध होता. खोतकर यांनी दानवे यांच्या विरोधात जालन्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. दरम्यान, ही सेना-भाजपच्या युतीनंतर खोतकर ही घोषणा मागे घेतील अशी चर्चा रंगली होती. मात्र, दानवेंविरोधात निवडणूक लढवणार या निर्णयावर खोतकर ठाम राहिले. त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं. दरम्यान, त्यांच्यातील हा वाद मिटावा यासाठी भाजपकडून हालचाली सुरु होत्या.

याच कारणास्तव सुभाष देशमुख यांनी जालना येथे खोतकरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट देखील घेतली होती. यावेळी दानवे देखील स्वत: त्यांच्यासोबत होते. या तिनही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा सुरु होती. मात्र, या चर्चेअखेरी कोणताच ठोस तोडगा निघाला नाही. मात्र अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी मध्यस्थी आणि मातोश्रीवरून आलेला आदेश यामुळे खोतकरांनी आपल्या बंडाची तलवार म्यान केली आणि जालना मतदारसंघात युतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे जाहीर केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -