घरठाणेठामपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला; अखेर सातवा वेतन आयोग लागू

ठामपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला; अखेर सातवा वेतन आयोग लागू

Subscribe

ठाणे : ठाणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्णयानुसार ठाणे महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन 29 ऑगस्ट 2022 रोजी कर्मचाऱ्यांच्या बॅक खात्यात जमा करण्यात आले आहे. त्या वेतनात (सप्टेंबर 2022चे वेतन) सातवा वेतन आयोग मिळाल्यामुळे ठाणे महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. अशाप्रकारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला असे म्हणावे लागले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचा कारभार हाती घेताच, ही आनंदाची बातमी ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना मिळाली. माजी महापौर नरेश म्हस्के यांनीही यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. सातवा वेतन आयोग सप्टेंबर 2022च्या वेतनात मिळाल्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनात भरघोस वाढ झाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग स्वीकृती करण्यासाठी संमती दिली, अशा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. तर, ठामपाच्या आस्थापनेवर असलेल्या काही पदांच्या वेतनश्रेणी या शासनाकडे असलेल्या वेतनश्रेणीशी समकक्ष आढळून न आल्याने या पदांबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. शासनाकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले.

- Advertisement -

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने अधिकारी, कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व अधिकारी कर्मचारी यांनी प्रशासक तथा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आभार व्यक्त केले आहेत.

सातवा वेतन आयोगाने झालेली वाढ
सातव्या वेतन आयोगानुसार ठाणे महापालिकेतील वर्ग 2 ते 4 च्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 8 ते 27 हजारांपर्यत वाढ झाली आहे. 2016 पूर्वी सेवेत लागलेल्या कनिष्ठ अभियंता यांच्या वेतनात 18 ते 22 हजार, उपअभियंता यांच्या वेतनात 27 हजार, मुकादम यांच्या वेतनात 10 ते 14 हजार, मॅकॅनिक यांच्या वेतनात 9 ते 10 हजार 500 पर्यंत, लिपिक यांच्या वेतनात 9 ते 10 हजार, जलनिर्देशक यांच्या वेतनात 12 ते 14 हजार, वाहनचालक यांच्या वेतनात 9 ते 10 हजार, सफाई कर्मचारी यांच्या वेतनात 8 ते 10 हजार, शिपाई यांच्या वेतनात 6 ते 7 हजार 700 तर 2016 पूर्वी लागलेल्या आरक्षकांच्या वेतनात 15 हजार 886 तर 2016 नंतर लागलेल्या कनिष्ठ अभियंत्याच्या वेतनात 12 ते 15 हजारांची वाढ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -