घरमहाराष्ट्रतुळजाभवानी मंदिर प्रशासनावर 'ड्रेसकोड'चा निर्णय मागे घेण्याची नामुष्की

तुळजाभवानी मंदिर प्रशासनावर ‘ड्रेसकोड’चा निर्णय मागे घेण्याची नामुष्की

Subscribe

उस्मानाबाद : तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिराच्या संस्थेच्या वतीने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार असभ्य कपडे घालण्यावर बंदी घालण्यात आली होती. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे मंदिरात लावण्यात आलेल्या फलकांवर लिहिण्यात आले होते. परंतु मंदिर प्रशासनाला 24 तासाच्या आतच आपला निर्णय मागे घेण्याची नामुष्की ओढवली.

मंदिर प्रशासनाच्या या निर्णयावर भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याशिवाय सोशल मीडियातून देखील मोठ्या प्रमाणावर टीका व्हायला लागल्यामुळे प्रशासनाला आपला निर्णय मागे घ्यायला लागला. याबाबत तहसीलदार सौदागर तांदळे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले आहे. सौदागर तांदळे म्हणाले की, तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या सर्व महंत, पुजारी, सेवेदारी आणि भाविक भक्तांना पुजेसाठी अथवा दर्शनासाठी कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?
“अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा” अशा आशयाचे फलक तुळजाभवानी मंदिर परिसरात मंदिर संस्थानाकडून लावण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मंदिर संस्थानच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानिमित्ताने मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सौदागर तांदळे व सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांचा सर्व पुजारी वर्गाकडून सत्कार करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे फक्त महिलांनाच हा नियम लागू न करता पुरूषांना सुद्धा कपड्यांच्या संदर्भातील नियमांचे पालन करावे लागणार होते.

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे. ही देवी भगवती म्हणून प्रसिद्ध आहे. स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला, असा दावा केला जातो. त्यामुळे या देवस्थानाला एक वेगळीच मान्यता आहे. त्यामुळे या मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी कपड्यांच्याबाबतीतला निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -