घरमहाराष्ट्रशरद पवार यांचे केंद्रावर आसूड, ईडीचा गैरवापर

शरद पवार यांचे केंद्रावर आसूड, ईडीचा गैरवापर

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मंदिर उघडण्यासाठी भाजपने केलेल्या आंदोलनावर शरद पवार यांनी कोरडे ओढले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचाही अंमल त्या पक्षाचे नेते करत नाहीत, अशा शब्दात पवारांनी भाजप नेत्यांचे कान ओढले. केंद्रातील सरकारच्या विचारांच्या नेत्यांनी आता तारतम्य बाळगण्याची आवश्यकता असल्याचे पवार म्हणाले.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी आंदोलक भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. भाजप आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर पवारांनी आपल्या शैलीत भाष्य केले. केंद्र सरकारने राज्य सरकारला कोरोनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. आणखी काही दिवस खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्य सरकार कटाक्षाने त्या सूचना पाळत आहे. अन्य घटकांची त्याबद्दल काही मते असू शकतात. त्यांना ते मांडण्याचा अधिकार आहे; पण त्यांच्याच विचाराचे सरकार अशी भूमिका घेते तेव्हा त्या विचाराच्या राज्यातील लोकांनी तारतम्य ठेवायची गरज होती. अशा व्यक्तींना काय सांगणार?

- Advertisement -

केंद्राकडून ईडीच्या होत असलेल्या गैरवापरावरूनही त्यांनी टीका केली. या यंत्रणांचा आतापर्यंत या देशात असा कधी वापर झाल्याचे मला तरी आठवत नाही. हल्लीच्या सरकारने ही यंत्रणा विरोधकांना नमवण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आणि दक्षिणेतील काही राज्यात हेच सुरू आहे. आपण केवळ महाराष्ट्रातील कारवायांवर चर्चा करतो. पण हा गैरवापर महाराष्ट्रापर्यंत सीमित नाही तर हा गैरवापर इतर राज्यातही सुरू आहे, असे पवार म्हणाले.

दिल्लीत उपोषणाला बसलेल्या शेतकर्‍यांवर लाठीमार करणार्‍या सरकारवर त्यांनी टीका केली. शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारवर हल्ला चढवताना पवार यांनी 14 महिने शेतकरी त्या ठिकाणी बसलेत. थंडी, ऊन आणि पाऊस याचा विचार न करता शेतकरी उपोषण करत आहेत. संवेदनशील राजकर्त्याने इतके दिवस अन्नदाता आंदोलन करतोय त्यांची नोंद घ्यायला हवी होती. हे देशाचे दुर्दैव आहे.

- Advertisement -

शेट्टींना दिलेला शब्द पाळला
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं विधान परिषदेतील आमदारांच्या यादीतून नाव कापल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर बोलताना पवारांनी या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. ते नाराज असतील त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. राष्ट्रवादीने जी यादी राज्यपालांना दिली आहे त्यात राजू शेट्टी यांचे नाव आहे. राजू शेट्टी यांचे सहकार आणि शेती क्षेत्रात योगदान मोठे आहे. ते पाहून त्यांना विधान परिषदेवर घ्यावे, असा प्रस्ताव आम्ही राज्यपालांना दिला आहे. राजू शेट्टी यांनी दिलेल्या आव्हानावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. आम्ही आमची कामे प्रामाणिकपणे केली आहेत. आता राज्यपाल काय करतात त्याची आम्ही वाट बघतोय, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -