घरमहाराष्ट्रदिल्लीच्या तख्तापुढे कदापि झुकणार नाही- शरद पवार

दिल्लीच्या तख्तापुढे कदापि झुकणार नाही- शरद पवार

Subscribe

शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार,मुबईसह राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र कदापि झुकणार नाही. हे शिव छत्रपतींचे राज्य आहे. त्यांचे संस्कार आमच्यावर आहेत. त्यामुळे दिल्लीच्या तख्तापुढे झुकण्याचा महाराष्ट्राचा इतिहास नाही, असे सांगत आपण स्वत: येत्या शुक्रवारी दुपारी २ वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी जाहीर केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील अनियमीत कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल खुलासा केला.

आपल्या विरोधात दाखल झालेला गुन्हा हा षड्यंत्राचा भाग असल्याचा मला संशय आहे. विधानसभा निवडणूक असल्यामुळे मी राज्याच्या दौर्‍यावर असणार आहे. त्यामुळे ईडीला माझ्याशी संपर्क साधायचा असल्यास मी कुठे अदृश तर झालो नाही, असा ईडीचा गैरसमज होऊ शकतो.

- Advertisement -

त्यामुळे शुक्रवार, 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. तिथल्या अधिकार्‍यांना माझ्यासंदर्भात काही माहिती हवी असल्यास ती मी देईल तसेच त्यांचा जो काही अन्य पाहुणचार असेल तोही घेण्याची माझी तयारी आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

ईडीच्या कारवाईनंतर शरद पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या तख्तासमोर झुकलेला नाही. हे शिव छत्रपतींचे राज्य आहे. त्यांचे संस्कार राज्यावर आहेत. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा महाराष्ट्राचा इतिहास नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. मी सध्या राज्याचा दौरा करत आहे. मला ठिकठिकाणी लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. माझा दौरा रोखण्यासाठी ही कारवाई केली जात आहे का? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला.

- Advertisement -

अशा प्रकारची कारवाई होण्याचा माझ्या आयुष्यातील हा दुसरा प्रसंग आहे. १९८० साली शेतकर्‍यांच्या प्रश्नावर जळगाव ते नागपूर अशी दिंडी काढली होती. त्यावेळी अमरावतीमध्ये मला अटक करण्यात आली होती. परंतु, या प्रकरणात निकाल माझ्या बाजूने लागला आणि तो प्रश्नच शिल्लक राहिला नाही, याची आठवण पवार यांनी करून दिली.

माझा संविधानावर विश्वास
फुले-शाहु-आंबेडकर यांच्याप्रती मी आस्था ठेवणारा आणि संविधानावर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. त्यामुळे माझे ईडीला निश्चितच पूर्णपणे सहकार्य असेल, असेही शरद पवार म्हणाले. राज्य सहकारी बँक ही महाराष्ट्रातील महत्त्वाची बँक आहे. राज्यातील जनतेला शेती, सहकार संस्था यासाठी कर्ज देण्याची भूमिका ही बँक बजावत असते. या बँकेमध्ये अनेक पक्षांचे नेते संचालक मंडळावर होते. भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर हे देखील संचालक होते. शिवसेनेचे आनंदराव अडसुळ, तसेच काँग्रेस आणि इतर पक्षांचे नेते देखील संचालक होते. विशेष म्हणजे या संचालकांची निवड कोणत्याही निवडणुकीशिवाय बिनविरोध झालेली होती, असे पवार यांनी स्पष्ट केले.

मी सहकार्य करणार
मी स्वतः कधीही सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर नव्हतो. मात्र तरीही ईडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला असेल तर माझे कर्तव्य आहे की मी त्यांना पूर्ण सहकार्य करावे, यासाठी त्यांची नोटीस येण्याआधीच मी स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार आहे, असे पवार म्हणाले.

शरद पवार यांच्यावरील ईडीची कारवाई ही कोणत्याही सूडबुद्धीने केलेली नाही. या कारवाई मागे राज्य सरकारचा कोणताही संबंध नसून विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

आपल्या विरोधात दाखल झालेला गुन्हा हा षड्यंत्राचा भाग असल्याचा मला संशय आहे. ईडीच्या अधिकार्‍यांना माझ्यासंदर्भात काही माहिती हवी असल्यास ती मी देईन आणि त्यांचा जो पाहुणचार असेल तोही घेण्याची माझी तयारी आहे. – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -