घरमहाराष्ट्रमावळमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं; फडणवीसांच्या टीकेला पवारांचं उत्तर

मावळमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं; फडणवीसांच्या टीकेला पवारांचं उत्तर

Subscribe

मावळमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं. मावळ गोळीबाराला राजकीय पक्ष नव्हे तर पोलीस जबाबदार होते, असं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने गाडीखाली चिरडल्याच्या घटनेचा निषेध करत या घटनेची तुलना शरद पवार यांनी जालीयनवाला हत्याकांडाशी केली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मावळमधील घटनेचा उल्लेख करत ही घटना जालीयनवाला हत्याकांड वाटली नाही का? असा सवाल शरद पवारांना केला. या प्रश्नाला शरद पवार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं.

लखीमपूरचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महराष्ट्रातल्या माजी मुख्यमंत्र्यांनी त्यावर भाष्य केलं. भाष्य केलं त्याबद्दल काही नाही, त्यांना तो अधिकार आहे. पण जे काही भाष्य केलं, त्यात ते म्हणाले की मावळमध्ये काय घडलं? एका दृष्टीने त्यांनी सांगितलं ते बरं केलं. कारण त्यावेळी तिथे काय घडलं हे कुणाच्या फारसं लक्षात आलं नाही. मावळमध्ये शेतकरी मृत्यूमुखी पडले, त्याला जबाबादार कुणी राजकीय पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे सरकारी नेते नव्हते. तो आरोप पोलिसांवर होता. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कारवाई केली. त्याला बराच काळ होऊन गेला आहे, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

शरद पवार यांनी पुढे बोलताना आता मावळबद्दलचं चित्र पूर्वीपेक्षा फार स्पष्ट झालं आहे. मावळमध्ये शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. त्याकाळी सत्ताधारी पक्षाबाबत लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली. पण आज मावळमधील लोकांना लक्षात आलं आहे की ज्यांच्यावर आपण आरोप केले, त्यांचा याच्याशी संबंध नव्हता. याउलट ही परिस्थिती हाताबाहेर जावी, यासाठी स्थानिक भाजपच्या लोकांनी प्रोत्साहित केलं आणि त्यामुळे संघर्ष झाला. म्हणून मावळमध्ये जो संताप होता, ते चित्र आता बदललं आहे, असं शरद पवार म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातला मावळचा गोळीबार झाला, याच काळात लोकांना भडकवण्याचं काम कुणी केलं हे मावळच्या जनतेच्या लक्षात आल्यानंतर आता झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके ९० हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. जर संताप असता, तर इतक्या मतांनी राष्ट्रवादीची जागा आली नसती. म्हणून माजी मुख्यमंत्र्यांनी मावळचं उदाहरण काढलं ते बरं झालं. जर त्यांनी मावळमधली परिस्थिती समजून घेतली, तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा सल्ला शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – चीनशी होत असलेल्या चर्चा अयशस्वी होणं हे चिंताजनक – शरद पवार


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -