शिंदे गट आदित्य ठाकरेंच्या शिवनिष्ठा यात्रेला देणार उत्तर, पूर्वेश सरनाईकांवर जबाबदारी

shinde group

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंच्या शिवनिष्ठा यात्रेला शिंदे गट उत्तर देणार आहे. आदित्य ठाकरे यांच्याबरोबर कार्यरत असणाऱ्या पूर्वेश सरनाईकच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या युवासेनेचा महाराष्ट्र दौरा होणार आहे. पूर्वेश आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव आहेत. अनेक वर्ष पूर्वेश युवासेनेत कार्यरत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाला शिंदे गट प्रत्येक पातळीवर चोख उत्तर देत आहे. विधिमंडळ गट फोडल्यानंतर नवे गटनेते नेमल्यावर एकनाथ शिंदे यांनी तोच कित्ता खासदारांच्या बाबत गिरवला आहे. ससदेत शिवसेनेचे 12 खासदार फोडून नवे गटनेते आणि व्हिप नेमून आपली राजकीय ताकद त्यांनी दाखवून दिली आहे. न्यायालयीन लढाईत देखील ठाकरे गटाला तोडीस तोड उत्तर शिंदे गट देत आहे. सध्या बंडखोरांविरोधात आदित्य ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याला शिंदे गट उत्तर देणार असून शिंदे गटाच्या आमदारांनी भूमिका आताच्या परिस्थितीला धरुन कशी बरोबर आहे, हे जनतेला पटवून देण्याकरिता पूर्वेश सरनाईक महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

शिंदे गटाच्या युवासेनेची जबाबदारी पूर्वेश सरनाईकांकडे –

राज्यातल्या प्रत्येक विभागातून ठाकरेंवर नाराज असलेल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटाकडे ओढा आहे. हे नाराज पदाधिकारी हेरुन आगामी काळात शिंदे गटात त्यांची कशी एन्ट्री होईल, यावर पूर्वेश सरनाईक काम करणार आहेत. शिंदे गटाची ताकद वाढवण्याची जबाबदारी शिंदे गट युवासेना म्हणून पूर्वेश सरनाईक यांच्या खाद्यावर असेल. त्यामुळे शिवसेनेला प्रत्येक पातळीवर टक्कर देणाऱ्या शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौऱ्याला उत्तर देण्यासाठी पूर्वेश सरनाईक यांना यांना मैदानात उतरवले आहे