घरमहाराष्ट्रसाई जन्मभूमी वाद : मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर आंदोलकांचं समाधान!

साई जन्मभूमी वाद : मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर आंदोलकांचं समाधान!

Subscribe

साई जन्मभूमीच्या वादावरून सुरू असलेल्या वादामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत शिर्डीच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या चर्चेनंतर हा वाद मिटल्याचं बोललं जात आहे.

साईबाबा यांचं जन्मस्थान नक्की कुठलं? शिर्डी की परभणीतलं पाथरी? या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये वाद सुरू झाला आहे. यामध्ये साईबाबांचा जन्म पाथरीमध्ये झाल्याचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाथरीमध्ये भाषणादरम्यान केला आणि तेव्हापासून हा वाद सुरू झाला. या मुद्द्यावरून शिर्डीतील ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी रविवारी शिर्डीमध्ये कडकडीत बंद पाळला. या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यानंतर हा बंद स्थगित करण्यात आला. अखेर, सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत शिर्डीतील ग्रामस्थ आणि आंदोलक सदस्यांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये आंदोलकांचं समाधान झाल्याची प्रतिक्रिया नगरमधील भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे शिर्डीतील आंदोलन मागे घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, याविषयी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिक माहिती जाहीर करणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.


हेही वाचा – छगन भुजबळ शिर्डीत… साईबाबा जन्मस्थान वादावर म्हणतात…

दरम्यान, या बैठकीत शिर्डीवासियांचं समाधान जरी झालेलं असलं, तरी पाथरीवासियांचं मात्र समाधान झालेलं नाही. पाथरीवासियांना या बैठकीत बोलावण्यात आलेलं नव्हतं. पाथरीतील आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आग्रहाने पाथरीची भूमिका मांडली आहे. ‘साईबाबांचा जन्म पाथरीमध्ये झाल्याचे २९ पुरावे आम्ही सादर करू शकतो. त्यामुळे पाथरीलाच साईबाबांचा जन्म झाल्याचं स्पष्ट आहे’, असा दावा दुर्राणी आणि इतर पाथरीवासियांनी कायम ठेवला आहे.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ग्रामस्थांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी. औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय बैठकीत आपण पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या भागाचा देखील विकास व्हावा. मुख्यमंत्र्यांच्या या यशस्वी मध्यस्थीनंतर पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला आमची हरकत नसल्याचे शिर्डीच्या ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -