घरताज्या घडामोडीइतिहासात पहिल्यांदाच शिर्डीचे साई मंदिर बंद, ऑनलाईन घेता येणार दर्शन!

इतिहासात पहिल्यांदाच शिर्डीचे साई मंदिर बंद, ऑनलाईन घेता येणार दर्शन!

Subscribe

करोनाचे विषाणु रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर खबरदारी घेतली जात असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शासकीय, सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

अवघे जग करोनाच्या भीतीने हादरले असताना महाराष्ट्रामध्येदेखील पुढचे पंधरा ते वीस दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सरकारच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगीतले. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (१७ मार्च) दुपारी ३ वाजल्यानंतर लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आणि अतिवर्दळीचे असलेल्या शिर्डी येथील साई मंदिरातील दर्शन आणि प्रवेश अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी ही माहिती दिली.
करोनाचे विषाणु रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर खबरदारी घेतली जात असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शासकीय, सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. गर्दी टाळण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर अद्यापही खुले होते. मात्र करोनाच्या विषाणूंनी जगभरात थैमान घातल्याने आता शिर्डी संस्थाननेदेखील अनिश्चित काळासाठी मंदिरात साईबाबांचे मिळणारे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आपोआपच शिर्डीतील भाविकांचा ओढा कमी होऊन गर्दी टाळण्यासाठी मदत होणार आहे.
राज्यातील बहुतांशी धार्मिक स्थळांचे दर्शन भाविकांसाठी बंद केल्याने त्याचेच अनुकरण आता शिर्डीमध्येदेखील होणार आहे. करोना विषाणूने राज्यातील स्थिती भयावह होत असताना, सोमवारी शिर्डीमध्ये सुमारे २० हजारावर भाविकांनी साईंचे दर्शन घेतले आहे. आता अनिश्चित काळासाठी व पुढील आदेश येईपर्यंत साई मंदिर दर्शनासाठी बंद केले जाणार असल्याने करोनाच्या बचावासाठी पावले उचलली गेली आहेत.

काय असेल बंद

भाविकांसाठी साईदर्शन बंद असेल. घरबसल्या भाविकांना ऑनलाईन दर्शन घेता येईल. साई संस्थानचे प्रसादालय, भक्तनिवासदेखील बंद असेल. मंदीर परिसरात ग्रामस्थ आणि भाविकांना प्रवेश राहणार नाही.

- Advertisement -

इतिहासात प्रथमत:च मंदिर अनिश्चित काळासाठी बंद राहणार

शिर्डीच्या साई संस्थानच्या इतिहासात मंदिर बंद ठेवण्याची वेळ ७९ वर्षानंतर प्रथमच आल्याचे सांगितले जाते. भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद करण्यात येणार असले तरी या काळात मंदिरात होणारे विधी सुरुच राहणार आहेत. नियमित होणारी काकड आरती, मध्यान्ह आरती, धुपआरती शेजआरती आदी धार्मिक विधी नेहमीप्रमाणे पार पडणार आहेत. दर गुरुवारी काढली जाणारी बाबांची पालखीदेखील मंदिरातील पुजाऱ्यांमार्फत काढली जाणार असून यामध्ये भाविकांचा सहभाग नसेल.

राम नवमी उत्सवावर देखील असेल करोनाचे सावट

काही दिवसांवर रामनवमी उत्सव येऊन ठेपला आहे. रामनवमी उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि गुजरातमधून पायी येणाऱ्या भाविक व पालख्यांचा समावेश असतो. साईभक्त रामनवमी उत्सवासाठी शिर्डीमध्ये येत असतात. या साईभक्तांनादेखील शिर्डीत न येण्याचे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. तसेच प्रत्येक पालखी प्रमुखाला संस्थानच्यावतीने पत्रदेखील पाठविण्यात आले आहे. ‘करोना’ राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाल्यानंतर रामनवमीनिमित्त शिर्डीमध्ये पालखी घेऊन येऊ नये, मंदिर परिसरात गर्दी टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे करोनाचे सावट रामनवमी उत्सवावरदेखील दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डीतील हॉटेल व व्यवसाय बंद करण्याचे निर्णय जिल्हाधिकारी लवकरच घेण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -