घरमहाराष्ट्रनाशिकशिवसैनिकांकडून भाजप कार्यालयावर दगडफेक

शिवसैनिकांकडून भाजप कार्यालयावर दगडफेक

Subscribe

नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याचे नाशकात पडसाद, ठिकठिकाणी आंदोलने

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. नाशिकमध्ये शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी राणे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली आहे. या हल्ल्यात भाजप कार्यालयाच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे सेना-भाजपमधील संघर्ष अधिक चिघळला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राणेंकडून सातत्याने मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. शिवसेनेतील काही मंत्री आणि आमदार नाराज असल्याने ते लवकरच भाजपमध्ये येणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. यावरही शिवसेनेच्या नेत्यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला होता. राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक संतापले आहेत. याचे पडसाद नाशिकमध्ये उमटले. एन.डी.पटेल रोडवरील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक केली. शिवसैनिक गाडीत बसून आले आणि त्यांनी भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली. यावेही शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोनाच्या काळात सावरले. ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. उध्दव ठाकरेंवर टीका केली तर त्याचे जशास तसे उत्तर दिले जाईल ही सुरूवात आहे, असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी राणे यांना दिला.

- Advertisement -

राणेंविरोधात नाशिकमध्ये तिसरा गुन्हा

नाशिक सायबर पोलिसांत शिवसेनेचे विरोधीपक्षनेते अजय बोरस्ते यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “या गुन्ह्यात आरोपी भारत सरकारचे मंत्री असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांचे विरोधात विधान केलेले आहे. गुन्ह्याची गंभीरता व्यापकता लक्षात घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर उपस्थित करणे आवश्यक असल्याने, एक पोलीस उप आयुक्त दर्जाचा अधिकारी नेमणे उपयुक्त वाटते. पोलीस उप आयुक्त संजय बारकुंड यांनी एक टीम तयार करुन मंत्री महोदय नारायण राणे यांना अटक करून कोर्टासमोर उपस्थित करण्याची कार्यवाही करावी” असे नाशिक पोलिसांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -