घरमहाराष्ट्र'डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचं भविष्य'

‘डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचं भविष्य’

Subscribe

संजय राऊत 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर बरसले

शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. यानंतर
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ईडीच्या कारवाईवरुन भाजपचा चांगलाच समाचार घेतला. राऊतांची पत्रकार परिषद संपताच भाजपच्या नेत्यांनी संजय राऊतांना लक्ष्य केलं. कर नाही तर डर कशाला? संजय राऊतांना घटना मान्य नाही का? अशी विधानं भाजपच्या नेतेमंडळींनी केली. दरम्यान, आता भाजपला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी ‘सामना’च्या अग्रेलखातून तुफानी फटकेबाजी केली आहे. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचं भविष्य असं म्हणत संजय राऊत बरसले. संजय राऊतांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

‘ईडी’च्या बाबतीत ज्यांना ‘घटना’ आठवते त्यांनी राज्यपाल नियुक्त जागांबाबतही घटनेचे स्मरण ठेवलं पाहिजे, असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. ‘ईडी’ वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडले पाहिजे.एकनाथ खडसे यांनी भाजप सोडताच त्यांना ‘ईडी’ची नोटीस यावी याला काय घटनेच्या चौकटीत राहत केलेले कार्य म्हणावे? आंध्र प्रदेशातील ‘टीडीपी’ खासदारांच्या घरावर ईडीच्या धाडी पडताच भेदरलेली मेंढरं निमूट भाजपच्या कळपात सामील झाली. ईडीचा प्रयोग लालू यादवांच्या बाबतीत फसला. प. बंगालात ईडीचा धाक दाखवून शारदा चीट फंड घोटाळ्यातील मुकुल राय वगैरे मंडळी एका रात्रीत भाजपमध्ये घुसली. महाराष्ट्रातही जे लोक ईडीचे गुणगान करून ईडीची नोटीस मिळताच कसे चौकशीला सामोरे जायला हवे असे मार्गदर्शन करीत आहेत, त्यांच्या पार्श्वभागात ईडी चौकशीचा बांबू घुसताच लंगड्या तंगड्यांनी हे बोलभांड भाजपात सामील झाले, असा घणाघात सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

- Advertisement -

“देवेंद्र फडणवीस म्हणतात ते देखील बरोबरच आहे, कर नाही त्यास डर कशाला? हे त्यांचे सांगणे अगदी बरोबर आहे. पण या नोटिसा देशभरात फक्त भाजपविरोधकांनाच का येत आहेत, हा प्रश्न आहे. देशात फक्त भाजपवालेच रोज गंगास्नान करतात व उर्वरित लोक गटारस्नान करतात असे काही आहे काय? शिवसेनेच्या बाबतीत सांगायचे तर कर नाही तर डर नाही वगैरे ठीकच, पण करून सवरून नामानिराळे राहणाऱ्यांची आमची अवलाद नाही. जे केले त्याची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबरीचा विध्वंस! तेथे रणातून पळून गेले ते कर आणि डरचे दाखले देत आहेत. हा विनोदच म्हणावा लागेल,” असा टोला फडणवीसांना लगावण्यात आला आहे.

“भाजपचे म्हणणे असे की, काँग्रेसच्या काळात ईडीचा गैरवापर झाला नाही काय? व्वा! काय म्हणायचे या अक्कलशून्य मंडळींना! काँग्रेसने कधीकाळी चुकीचे वर्तन केले म्हणून आम्हालाही अंगास शेण फासण्याचा व शेण खाऊन थयथयाट करण्याचा अधिकार आहे असेच ते म्हणतात. मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच बदलून तुम्ही ईडी कार्यालयात बसून नवी घटना लिहून काढलीत? हवाबाण थेरपीचा अतिरेक झाला की, मेंदूत सडकी हवा जाते. त्या पादऱ्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत त्यांचे नाव भाजप!” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपवर ‘सामना’च्या अग्रलेखातून केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -