घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहामार्ग बस डेपोमधून शिवशाही निघाली, १ किलोमीटर जाताच बसच्या 'एसी'ने टाकली नांगी,...

महामार्ग बस डेपोमधून शिवशाही निघाली, १ किलोमीटर जाताच बसच्या ‘एसी’ने टाकली नांगी, नंतर २ तास चालला सावळा गोंधळ

Subscribe

नाशिक : प्रवाशांच्या सेवेसाठी… सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी हे ब्रीद घेऊन प्रवाशांची सेवा करणारी शिवशाही मुंबई नाक्यावरील महामार्ग बसस्थानकातून बोरिवलीकडे निघाल्यानंतर 1 किलोमीटरही धावली नाही तोच नादुरुस्त झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना समोर आली आहे.

त्याचे झाले असे की, महामार्ग बसस्थानक, मुंबई नाका येथून रविवारी (दि. 22) दुपारी साडेबाराच्या सुमारास नाशिक-बोरिवली शिवशाही बस (एमएच 06- बीडब्ल्यू 1059) निघाली. मात्र 1 किलोमीटरही शिवशाही धावली नसेल एवढ्यात तिचा एसी बंद पडला. एसीतून पाण्याची धार लागली. यामुळे प्रवाशी त्रस्त झाले. त्यांनी बसचालकाकडे तक्रार केली.

- Advertisement -

विना एसी बोरिवलीपर्यंतचे 187 किलोमीटरचे अंतर कापणे अशक्य असल्याने चालकाने शिवशाही एन.डी. पटेल रोडवरील बस डेपोत आणली. याठिकाणी डेपोच्या गेटवर प्रवाशांना उतरविण्यात आले. चालकाने बस दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये नेली. नेमका याचवेळी गॅरेजमधील कामगारांची जेवणाची वेळ असल्याने नवीन बसची तपासणी करुन बस डेपोतून बाहेर काढायला चालकाला सुमारे 1 तास लागला. मात्र यामुळे नाशिक-बोरिवली प्रवास करण्यासाठी बसमध्ये चढलेल्या प्रवाशांना भर उन्हात दुपारी 1 च्या सुमारास मनस्तापाला सामोरे जावे लागले. यामुळे प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

बदली झालेली शिवशाही बस डेपोच्या गेटवर आली. मात्र पुन्हा डेपोतील एका कर्मचार्‍याने बसमध्ये डिझेल आहे का हे बघावे लागेल म्हटल्यावर प्रवाशांचा जीव पुन्हा भांड्यात पडला. प्रवाशांनी बस बोरिवलीपर्यंत पोहाचेल का? असा प्रश्न बस चालकाला विचारला. चालकाने बोरिवलीपर्यंत बस पोहोचण्याची शाश्वती दिल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सुमारे १ तासानंतर दीड वाजता बस बोरिवलीकडे मार्गस्थ झाली.

- Advertisement -

प्रवाशांमध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला मोठ्या संख्येने होते. त्यांना एन.डी. पटेल रोडवरील डेपोतून पुन्हा महामार्ग बसस्थानकावर जाणेही अशक्य होते. यामुळे इकडे आड अन तिकडे विहीर अशी अवस्था या प्रवाशांची झाली. नाशिकमध्ये सुमारे 40 ते 42 अंश तापमान असतांना डेपोच्या गेटवर उतरविलेल्या प्रवाशांना बसायला शेड नाही, खुर्ची नाही की पाणीही नाही यामुळे महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचे प्रदर्शन यावेळी प्रवाशांना बघायला मिळाले. एकूणच एसटी महामंडळाच्या बेजबाबदार कारभाराचा फटका बसल्याने नाशिक-बोरिवली प्रवास करणार्‍या प्रवाशांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -