अनुकंपाच्या प्रतीक्षा यादीत भावाच्या ऐवजी बहिणाला मिळाली जागा; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

संग्रहित छायाचित्र

 

मुंबईः अनुकंपा नोकरीच्या प्रतीक्षा यादीत भावाच्या ऐवजी बहिणाचे नाव टाकावे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कारण अनुकंपा नोकरीच्या प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या उमेदवाराचे निधन झाल्याशिवाय दुसऱ्या कुटुंब सदस्याचे नाव तेथे टाकता येत नाही, असा राज्य शासनाचा नियम आहे. मात्र बहिणीला नोकरी देण्यास भावाची संमती आहे. बहिण आईची काळजी घेणार आहे. त्यामुळे बहिणीचे नाव प्रतीक्षा यादीत टाकण्यात काहीच अडथळा नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्या. रमेश धानुका व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. याप्रकरणी शुभांगी विठ्ठल कामोदकर यांनी याचिका केली होती. शहर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नाशिक महापालिका आयुक्त. आरोग्य विभागाचे सह आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले होते. २२ जून २०२१ रोजी आरोग्य विभागाचे सह आयुक्त यांनी पाठवलेले पत्र रद्द करावे. अनुकंपा नोकरीसाठी असलेल्या प्रतीक्षा यादीत भावाच्या ऐवजी माझे नाव टाकावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

शुभांगी याचे वडिल नाशिक महापालिकेत वरीष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. २७ एप्रिल २०१४ रोजी त्यांचे निधन झाले. कर्तव्यावर असताना वडिलांचे निधन झाल्याने अनुकंपा नोकरीसाठी भाऊ गौरेश पात्र होता. त्याने १७ मे २०१४ रोजी अनुकंपा नोकरीसाठी अर्ज दिला. मात्र २०१८ मध्ये शुभांगी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यामुळे त्यांनी ५ जून २०२१ रोजी अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला. तसेच भाऊ गौरेशच्या जागी माझे नाव प्रतीक्षा यादीत टाकावे, अशी विनंती शुभांगी यांनी अर्जात केली.

२२ जून २०२१ रोजी आरोग्य विभागाचे उपायुक्त यांनी गौरेशला अनुकंपा नोकरी देण्यासाठी त्याची कागदपत्रे मागवून घेतली. तसे पत्र गौरेशला पाठवण्यात आले. मात्र माझा अर्ज प्रलंबित असताना आरोग्य विभागाच्या सह आयुक्त यांना भावाला अनुकंपा नोकरी देण्यासाठी त्याची कागदपत्रे मागवून घेतली. तसे पत्र त्याला दिले. हे पत्र रद्द करावे व माझे नाव प्रतीक्षा यादीत टाकावे, अशी मागणी शुभांगी यांनी याचिकेत केली.

नियमानुसार वडिलांच्या निधनानंतर गौरेशने अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला. त्यालाच अनुकंपा नोकरी द्यावी अशी ना हरकत शुभांगी व अन्य भावाने दिली आहे. मी कुटुंबाची काळजी घेईन असे प्रतिज्ञापत्र गौरेशने दिले आहे. त्यामुळे त्याचे नाव प्रतीक्षा यादीत टाकण्यात आले आहे, असे प्रतिज्ञापत्र आरोग्य विभागाने न्यायालयात सादर केले.

मात्र गौरेशला नोकरी दिलेली नाही. तसेच आई माझ्याकडे असते. आईची मी काळजी घेते. मला अनुकंपा नोकरी द्यावी, यासाठी भावाने ना हरकत दिली आहे. तरीही माझे नाव प्रतीक्षा यादीत टाकले जात नाही, असा युक्तिवाद शुभांगी यांच्यावतीने करण्यात आला.

अनुकंपा नोकरीच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवाराचे निधन होत नाही तोपर्यंत अन्य कुटुंब सदस्याचे नाव प्रतीक्षा यादीत टाकता येत नाही, असा दावा आरोग्य विभागाने केला. मात्र याप्रकरणात भावाच्या ऐवजी बहिणीचे नाव प्रतीक्षा यादीत टाकण्यात काहीच अडचण नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने वरील आदेश दिले.