Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र समाजसेविका सुमनताई बंग कालवश

समाजसेविका सुमनताई बंग कालवश

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ समाजसेविका, गांधी विचारक, चेतना विकासच्या अग्रणी आणि स्त्री सक्षमीकरणाच्या कृतीशील मार्गदर्शक सुमनताई बंग यांचे सोमवारी सेवाग्राम रुग्णालयात निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. महात्मा गांधी यांचे अनुयायी व अर्थतज्ज्ञ दिवंगत ठाकूरदास बंग यांच्या त्या सहचारिणी असलेल्या सुमनताई या प्रसिद्ध समाजसेवकअशोक बंग व डॉ. अभय बंग यांच्या मातोश्री म्हणून परिचित असल्या तरी स्वतःच्या कर्तृत्वाने व व्रतस्थ सेवाकार्याने सुमनताई यांनी समाजमनावर आपला अवीट ठसा उमटवला होता.

बचत गटाचे काम देशपातळीवरही फारसे रुळले नव्हते, त्या काळात वर्धा जिल्ह्यातील परितक्त्या व विधवा स्त्रियांना सोबत घेऊन बचत गटांचे जाळे सुमनताई यांनी निर्माण केले होते. स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी कार्यरत असतानाच शाश्वत शेती, खादी व शिक्षण प्रणालीत प्रयोगशीलता, निसर्गोपचार, कांचनमुक्ती, सामूहिक जीवन, युवक-युवतींसाठी लैंगिक शिक्षण, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, पती-पत्नी संमेलन, सासू-सून संमेलन असे अनेक अभिनव उपक्रम नि:स्वार्थपणे त्यांनी आयुष्यभर राबविले.

- Advertisement -

अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबात 1925 साली त्यांचा जन्म झाला. सुमनताईंनी विद्यार्थीदशेत सेवादलाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले.स्वातंत्र्योत्तर काळातही विनोबांच्या भूदान, ग्रामदान आणि ग्रामस्वराज्य आंदोलनात त्या सहभागी होत्या. पुढे जयप्रकाश नारायण यांच्या समग्र क्रांती आंदोलनातही सहभागी होत त्यांनी स्त्रियांचे नेतृत्व केले होते. जगण्यात साधेपणा आणि विचारांमध्ये वैज्ञानिकता स्वीकारलेल्या सुमनताई बंग यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले होते.

- Advertisement -