घरCORONA UPDATEउद्यापासून ST वाहतूक सुरू, तिकीट दराबाबत मंत्री म्हणतात...!

उद्यापासून ST वाहतूक सुरू, तिकीट दराबाबत मंत्री म्हणतात…!

Subscribe

Corona साथीच्या पार्श्वभूमीवर देशासोबतच राज्यातही अनेक महत्त्वाच्या सेवांवर निर्बंध घातले गेले. ST वाहतूक अर्थात लालपरीची सेवा देखील बंद करण्यात आली. त्यामुळे जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा असे दोन्ही प्रकारचे प्रवास बंद झाले. त्यासोबतच गेल्या ५ महिन्यांपासून राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एसटी वाहतूक बंदच असल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. आज अखेर राज्य सरकारने Mission Begin Again 6 अंतर्गत आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी दिली असून येत्या २० ऑगस्टपासून म्हणजेच उद्यापासून ही एसटी वाहतूक सुरू होणार आहे. अवघ्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. त्यासोबतच या एसटी सेवेसाठी किती तिकीटदर असतील, याविषयी देखील परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

कसा करता येणार प्रवास?

सध्या एसटीमधून सामान्य प्रवाशांची वाहतूक करता येत नाही. मात्र, उद्यापासून ही वाहतूक करता येणार असून त्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नसेल. ई-पास (E-Pass) किंवा कोणताही परवाना काढण्याची आवश्यकता भासणार नसून आवश्यक त्या गोष्टींचं पालन करून हा प्रवास करता येणार आहे. मात्र, असं जरी असलं, तरी इतर खासगी वाहनांना ई पास आवश्यकच असणार आहे. एका बसमध्ये फक्त २२ प्रवाशांना परवानगी, सोशल डिस्टन्सिंगचं पालन अशा प्रकारच्या नियमांचं पालन प्रवाशांना करावं लागेल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. गुरुवारपासून सुरु होणार्‍या एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्याटप्याने सुरु होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, एसटीला या फेऱ्या चालवताना आर्थिक तोटा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एसटी सेवा सुरू झाल्यानंतर त्याचे तिकिटदर जास्त असतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, एसटी तिकिटांचं मूल्य तितकंच राहील, हे देखील परब यांनी यावेळी स्पष्ट केलं. एसटीच्या प्रवासाचाच विचार केला, तर एका एसटीला दर १०० किलोमीटरमागे साधारणपणे ३ ते ३.५ हजार रुपयांचं उत्पन्न अपेक्षित असताना नव्या नियमांनुसार निम्म्या प्रवाशांमुळे हे उत्पन्नही निम्म होणार आहे. त्यामुळे हा तोटा वाढल्यास एसटी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -