घरमहाराष्ट्रअणुऊर्जा प्रकल्प : उपकरणांच्या निर्मितीसाठी सामंजस्य करार

अणुऊर्जा प्रकल्प : उपकरणांच्या निर्मितीसाठी सामंजस्य करार

Subscribe

अणुऊर्जा प्रकल्पास लागणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राचा ‘होलटेक’ समवेत सामंजस्य करार पार पडला.

अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये इंधन साठवणूक आणि ऊर्जा वहनासह विविध उद्दिष्टांसाठी लागणाऱ्या उपकरणांसह इतर सामग्री पुरवण्यामध्ये जगप्रसिद्ध असलेल्या होलटेक इंटरनॅशनल या कंपनीने महाराष्ट्रामध्ये अणुऊर्जा प्रकल्पांसाठी लागणारी उच्च दर्जाची सामग्री उत्पादित करणारा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार राज्य शासनाने होलटेक कंपनीसमवेत आज सामंजस्य करार केला आहे. यामुळे अणुऊर्जा साधनांचे उत्पादन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी होलटेक कंपनीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णा सिंग, वरिष्ठ उपाध्यक्ष ज्योती चॅटर्जी आणि शासनाच्या उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतिश गवई यांनी करारावर स्वाक्षरी केली. होलटेक इंटरनॅशनल ही ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेषत: अणुऊर्जा क्षेत्राशी निगडित कंपनी आहे. आजवर जगात 6 खंडांमध्ये मिळून 35 देशांतील 200 पेक्षा जास्त अणुऊर्जा प्रकल्पांना या कंपनीने सुटे भाग पुरविले आहेत.

सामंजस्य करारमध्ये नेमकं काय?

आज झालेल्या सामंजस्य करारानुसार, हा प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कंपनीकडून 680 दशलक्ष अमेरीकन डॉलर्स (सुमारे 4 हजार 800 कोटी रुपये) गुंतवणूक होणे अपेक्षिषत आहे. होलटेक कंपनीच्या अमेरीकेतील प्रकल्पासारखाच हा प्रकल्प असेल. ऊर्जा आणि प्रक्रिया, एरोस्पेस, पेट्रोकेमिकल आणि इतर क्षेत्रातील कंपन्यांना संयंत्रांची निर्मिती करताना लागणाऱ्या अवजड सुट्या भागांची निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक आणि योग्य ते सहकार्य पुरवले जाईल. यामध्ये प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या मंजुऱ्या-परवानग्या एक खिडकी योजनेतून सुलभरीत्या देण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी नियोजित गुंतवणुकीला राज्य सरकारच्या विविध धोरणे आणि नियमांनुसार प्रोत्साहन आणि सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारद्वारे मेक इन इंडिया अभियानांतर्गत अणुऊर्जा क्षेत्रात उत्पादनामध्ये स्वावलंबी होण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे हा करार आहे. भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर आणि यासारख्या इतर भारतीय संस्थांसमवेत मिळून काम करण्यासाठी तसेच या संस्थांना आपले जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी कंपनी उत्सुक आहे. अणू क्षेत्रामध्ये भारताच्या सातत्याने होत असलेल्या प्रगतीमध्ये योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने वाटचाल करताना, महाराष्ट्रात असलेले गुंतवणूक पूरक वातावरण आणि तांत्रिक उपलब्धता लक्षात घेऊन महाराष्ट्रालाच त्यांनी पसंती दिली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -