साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी अपडेट! आणखी एकाला अटक, नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता

सुरूवातीला सदानंद कदम आणि नंतर आधीच निलंबीत असलेले तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडेंना अटक केल्याने आता या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Sai-Resort-Case-big-Update

राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या कोकणातील दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वीच अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने चौकशीनंतर अटक करण्यात केली आहे. त्यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी दापोलीतील तत्कालीन प्रांताधिकारीला अटक करण्यात आली असून साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचाआरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे आता या अटकेनंतर साई रिसॉर्ट प्रकरणी महत्त्वाचे धारेदोरे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

जयराम देशपांडे असं ईडीने अटक केलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. ते तत्कालीन उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यभार पाहत होते. विशेष म्हणजे गेल्या जानेवारीमध्ये त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. ईडीने अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने कारवाईचा बडगा उचलला आहे. साई रिसॉर्ट व अन्य काही प्रकरणांत खोट्या व बेकायदेशीर पद्धतीने ना-विकास क्षेत्रात बांधकाम करण्याची परवानगी दिल्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने तत्कालीन उपविभागीय अधिकारी दापोली जयराम देशपांडे यांचे निलंबन केलं होतं.

दापोली तालुक्यातील मुरूड येथील साई रिसॉर्ट हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा उजवा हात व रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांचे असल्याचा आरोप भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वारंवार केला आहे. आता पुन्हा हे प्रकरण चर्चेत आलंय. सुरूवातीला सदानंद कदम आणि नंतर आधीच निलंबीत असलेले तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडेंना अटक केल्याने आता या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.