नागपूरमधील तीन भ्रष्टाचार प्रकरणं, सुभाष देसाईंनी भर मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांची कुंडलीच मांडली

नागपूरमध्ये ५०० कोटी मालमत्ता कर आलेला नाही. श्रीमंत लोकांचे मालमत्ता कर माफ करण्यात आले का?याची चौकशी देवेंद्र फडणवीस करणार का? असा प्रश्नही सुभाष देसाईंनी उपस्थित केला. 

subhash desai

मुंबई- शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर सुरुवात झाली आहे. अफाट जनसमुदाय शिवाजी पार्कवर जमा झाला आहे. यातच, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही दसरा मेळाव्यात जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी खासकरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत लक्ष घालण्यापेक्षा नागपूरच्या भ्रष्टाचाराबाबत बोलावं असं म्हणतच, नागपूरमधील तीन गैरप्रकारच लोकांसमोर मांडले आहेत.

भाजपाचे लोक, खासकरून देवेंद्र फडणवीस नागपूरहून आले आणि इथे धमकी देताहेत की मुंबई पालिकेच्या शिवसेनेच्या कारभारीच चौकशी करू. शंभर चौकशी करा, काहीही होणार नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी इथल्या कोपऱ्याकोपऱ्यात फिरून मुंबई सुंदर बनवली आहे, असं सुभाष देसाई म्हणाले.

सुभाष देसाईंनी कोणच्या तीन भ्रष्टाचारावर केली टीका

फडणवीसांनी आधी नागपूरमध्ये चौकशी करावी. नागपूरमध्ये ‘आपली बस’ योजना सुरू केली. या योजनेत खासगी ठेकेदाराला बस चालवायला दिल्या. सुरुवातीला तिकिटाच्या उत्पन्नात काम करण्याची सुविधा होती. आता त्यासाठी १०० कोटी देण्याचा घाट घातला जात आहे. याची चौकशी करणार देवेंद्र फडणवीस करणार का असा सवाल सुभाष देसाईंनी उपस्थित केला आहे.

नागपूरमध्ये ५०० कोटी मालमत्ता कर आलेला नाही. श्रीमंत लोकांचे मालमत्ता कर माफ करण्यात आले का?याची चौकशी देवेंद्र फडणवीस करणार का? असा प्रश्नही सुभाष देसाईंनी उपस्थित केला.

नागपूरकरांना चोवीस तास पाणी देऊ म्हणून ओसीडब्ल्यू भाजपाशी संबंधित कंपनीला ठेका दिला. चोवीस तास पाणी नागपूरकरांना मिळालंच नाही. नागपूर तरीही तहानलेलं आहे. ओसीडब्ल्यू कंपनी ८० कोटी रुपये पालिकेकडे मागतेय. त्यामुळे भाजपाचे नेते दबाव आणत आहेत. ७० कोटी तरी कंपनीला द्या असा दबाव आणत आहेत. या कंपनीवर नगरविकास विभाग मेहेरबान का होत आहे, याची चौकशी करा, असंही सुभाष देसाई म्हणाले.