घरमहाराष्ट्र'मुलाने शिंदे गटात केलेला प्रवेश क्लेशदायक', सुभाष देसाईंनी सांगितला भूषण आणि शिवसेनेचा...

‘मुलाने शिंदे गटात केलेला प्रवेश क्लेशदायक’, सुभाष देसाईंनी सांगितला भूषण आणि शिवसेनेचा काय आहे संबंध

Subscribe

पाच दशकांहून अधिक काळ ठाकरे कुटुंबिय आणि शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकनिष्ठ असलेले सुभाष देसाई यांच्या घरात शिवसेनेतील दोन गटांमुळे फूट पडली आहे. त्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

मुंबई – शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते, माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी आज (सोमवार, 13 मार्च) एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. मात्र भूषण देसाई यांचा शिवसेनेशी आणि राजकारणाशी काही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या जाण्याने शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं स्वतः सुभाष देसाईंनी म्हटलं आहे.

पाच दशकांहून अधिक काळ ठाकरे कुटुंबिय आणि शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकनिष्ठ असलेले सुभाष देसाई यांच्या घरात शिवसेनेतील दोन गटांमुळे फूट पडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारमध्ये सुभाष देसाई हे उद्योग मंत्री होते. शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतरही ते उ्दधव ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. मात्र त्यांचा मुलगा भूषण देसाई यांनी सोमवारी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. त्यावर सुभाष देसाई यांनी म्हटले आहे की, ‘माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.’ असे म्हटले आहे.

- Advertisement -

मुलाने विरोधी पक्षात प्रवेश करणे हे सुभाष देसाईंसाठी क्लेशदायक ठरले आहे. पाच दशकांपासून शिवसेना आणि देसाईंचा संबंध राहिला आहे, त्यावर ते म्हणाले, ‘शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व
मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

सुभाष देसाई हे ज्येष्ठ नेते आहेत. ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आले होते. आताही ते कायम आदित्य ठाकरे यांच्या सोबत असतात. रविवारी झालेल्या शिवगर्जना सभेतही देसाई हजर होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातमध्ये पळवले जात असल्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला बोल केला. त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात दावोसमध्ये अनेक विदेशी कंपन्यांसोबत करार झाल्याचे आदित्य यांनी याच सभेत सांगितले. अशा ज्येष्ठ नेत्याच्या मुलाने शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरेंना हा शह मानला जात आहे. मात्र देसाईंनी आपली निष्ठा ही मातोश्रीची असल्याचे सांगत म्हटले आहे, ‘वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे.’

शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक रस्त्यावरही पक्षाच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. यात सोबत राहाण्याचा आश्वासन सुभाष देसाईंनी ठाकरेंना दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -